एखादा शब्द नागपूर, इंदूर, भोपाळ, जबलपूर या भागांत सररास वापरला जात असला, की तो जिवंत मराठीतला असला तरी प्रमाण मराठीतला असेलच असे होत नाही. या भागांतल्या मराठीवर हिंदीची छाप आहे. अर्थात, ज्याअर्थी मचणे शब्दकोशात आहे त्याअर्थी तो शब्द महाराष्ट्रात कधीनाकधी कुठेनाकुठे वापरात असला पाहिजे. दोन्ही शब्द बहुधा संस्कृत शब्द मद-मत्त वरून आले असावेत.
माजणे वापरात आहेच, मचणेदेखील वापरात ठेवावा. मात्र अर्थच्छटेत थोडा फरक असावा. प्राणी, व्यक्ती, राजा, पुढारी यांच्याबाबतीत माजणे आणि रान, गोंधळ, बजबजपुरी, हाहाकार यांच्याबाबतीत, आपोआप झाला असेल तर मचणे आणि कुणी घडवून आणला असेल तर माजणे असे प्रयोग करीत रहावेत. हिंदीतही मच गया, मचावो, मचा था, मचायेंगे अशी अकर्मक किंवा थोडीशी प्रयोजक भासणारी रूपेच प्रचारात आहेत.