ज्या वेळी दुसऱ्याला काय वाटेल असा आपण विचार करत असतो तेव्हा खरं तर 'आपल्या विषयी दुसऱ्याचं काय मत होईल' असा विचार आपण करत असतो म्हणजे अगदी सरळसरळ आपण आपलाच विचार करत असतो पण हे न समजल्यानी आपण पेचात सापडतो आणि मग स्वतःच्या मनाविरूद्ध वागायला लागल्यामुळे पुन्हा मनस्ताप सहन करतो.
हे लक्षात येणं सोपं आहे पण आपल्याला हवं तसं प्रामाणिकपणे वागायची रिस्क कुणी घेत नाही.
मी आतापर्यंत अनेक लोकप्रिय व्यक्ती बघितल्या आहेत पण तुम्ही त्यांना व्यक्तिगत संवादात विचारलं तर त्यांनाही आपण वापरले जातोयं हे माहिती असतं तरीही स्वप्रतिमेला तडा जाईल म्हणून त्यांना लोकांना आवडेल असं वागवं लागतं हे त्या व्यक्ती कबूल करतात.
तुम्हाला नित्शेचं, जन्मभर उपयोगी होईल असं अफलातून वाक्य सांगतो: नित्शे म्हणतो 'टू यूज द अदर इज द हायेस्ट इम्मॉरॅलिटी" (दुसऱ्याला वापरणं ही मानवी संबंधातली पराकोटीची अनैतिकता आहे) आणि त्याचाच दुसरा भाग पण इथे नमूद करतो : 'दुसऱ्याला स्वतःला वापरू देणं ही स्वतःशी केलेली कमालीची अप्रामाणिकता आहे' (टू अलाऊ द अदर टू यूज यू इज बीट्रेईंग योरसेल्फ!)
अर्थात दुसरा जेव्हा आपल्याला वापरतो तेव्हा आपलाही त्यात निहित स्वार्थ असतोच, कधी तो स्वतःची प्रतिमा असतो तर कधी दुसऱ्याकडून मिळणाऱ्या भविष्यकालीन फायद्याचा मोह असतो हे एकदा कळलं की आपल्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीची एकसंधता येते आणि मग असे कुठलेच प्रश्न उरत नाहीत.
संजय