आमच्याकडे एक 'स्वयंघोषित' रामदासी असेच केव्हाही येऊन बसत. ते वयस्क  असल्याने माझे आई-वडील त्यांचे उगाचच आदरातिथ्य करत असत. ते मात्र कायम आत्यंतिक अहंमन्य फुशारक्या मारत बसत. वय बरेच असल्याने ते बिनधास्तपणे 'आपण सावरकरांच्या आणि श्रीधर स्वामींच्या बरोबर कार्य केले आहे' अशा वल्गना करत राहात. पण त्यांचं वर्तन आणि उगाचच पाचकळ बोलणं, कारण नसताना आणि कोणीही विचारलेले नसताना उच्चरवात परोपदेश करणं  हे त्यांच्या रामदासी असणं आणि पांढरे कपडे घालणं आणि समर्थांनी सांगितलेल्या 'समर्थाचिया सेवका' च्या लक्षणांशी एकदम विपरीतच होतं. ते येऊन बोलू लागले की आजू बाजूच्या लोकांचे नजरा उगाचच आमच्याकडे वळत असत, आणि भोवतालच्या लोकांना आश्चर्य आटत असे की एवढ्या असभ्य माणसाला हे का थारा देतात? भोवतालच्या सर्वसामान्य शेजाऱ्यांपुढे आम्हालाच मग ओशाळवाणं होत असे ...  केवळ वयाकडे पाहून आम्ही दुर्लक्ष करत होतो.

पण एकदा हे महाशय असेच कोणतीही पूर्वसूचना न देता आले आणि काहीतरी भंपक बडबड तीही उच्चरवात कोकलायला लागले. त्या दिवशी मात्र मी कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्या महात्म्याला घराबाहेर काढले ... परत आमच्याकडे फिरकण्याची त्याची हिंमतच झाली नाही ... अर्थातच त्याच्या न येण्यामुळे आमचे काहीच अडले नाही ....