पंत आजोबा आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हाची गोष्ट. शाखेचा कुठला तरी कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर सर्वांनी आपापला परीचय करून दिला. विश्रम झाल्यावर केदार बरोबर गप्पा मारत उभा होतो तेवढ्यात पाठीवर अचानक हळुवार थाप पडली आश्चर्याने मागे बघतो तर एक आजोबा स्मितहास्य करत माझ्याकडे पाहताना दिसले.
मी जरा गोंधळलो. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. माझ्या अंगातल्या स्वेटरबद्दल. मी परत गोंधळलो.
पंत :स्वेटर छान आहे.
मी: हो धन्यवाद.
पंत : पण ह्यावर तर इंग्लंडचा झेंडा आहे.
(त्या स्वेटर वर बरोबर मधोमध इंग्लंडचा राष्ट्रध्वज होता )
मी : हो, माझी बहिण इंग्लंडला असते तिने आणलाय माझ्यासाठी.
पंत : (परत एकदा स्मितहास्य करत), हा झेंडा आपल्या देशातून बाहेर काढण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी आपले प्राण अर्पण केले आणि आपले तरुण हा झेंडा छातीवर घेवून फिरतायत.
बस्स मी क्षणात निश्शब्द झालो. घरी गेल्या गेल्या मी स्वेटर काढून त्यावरच झेंडा काढून टाकला.