'फुरसत' हा फुर्सत या उर्दू शब्दाचा मराठीत अर्थ आहे, स्वास्थ्य, निवांतपणा!
गालिब शायर असल्यानी 'दिल ढूंढता है फिर वही फुर्सतके रात दिन, बैठे रहे तसव्वुरे-जाना किए हुए' असं म्हटलंय आणि बहुतेकांना असंच वाटतं की फुरसतीचे 'ते दिवस' संपले! आणि मजा म्हणजे या खंतावण्यानीच फुरसत हरवते!
फुरसत संपली नाही, फुरसत आता या क्षणात मिळवायची आहे. आज इतकी संपन्नता आल्यावर आणि आकलन असल्यावर फुरसत मिळवणं काय अवघड आहे?
फुरसत म्हणजे स्वतःची स्वतःशी भेट, या भेटीतून फुरसत निर्माण होते, मुक्तछंद जगण्याचे विविध आयाम खुले होतात. मग 'जाडोंकी नर्म धूप और आंगनमे लेटकर, आखोंपे खिंचकर तेरे आंचलके सायेको ' इतकी वाट पाहण्याची आवश्यकता नाही; हातातला चहाचा कप आणि बाहेर कोसळणारा पाऊस महौल रंगवायला पुरेसा होतो, तुम्ही 'रिमझिमके तराने लेके आयी बरसात' म्हणायला लागता. जिथे आहात तिथे आणि जे असेल ते वातावरण आनंदी करता येतं कारण आनंद ही काही पुढे मिळणारी किंवा मागे हरवलेली वस्तू नाही, ती आता इथे आणि नेहमी उपलब्ध आहे, आपली नजर कवी कल्पनांवरून स्वतःप्रत आली की मग फुरसतीचा माहौल कायमचा उपलब्ध आहे कारण आपण स्वतःच ती फुरसत आहोत!
संजय