मी अनिल खांडेकरांशी सहमत आहे. परिकथा ऐकणारी मुलं ही वय वर्षं २ ते ५ वगैरे असतात. या वयात जेमतेम त्यांना स्वतःचे नाक पुसता यायला लागलेले असते. या वयापासून त्यांना कोणत्या सत्याची ओळख करून देणार आपण? हे त्यांचे वय पुन्हा येणार नसते आणि पुढे त्यांना एकेका सत्याला (भयानक सत्याला) सामोरे जायचेच असते. मग त्यांचे बाल्य कुस्करून आपण नेमके काय साधणार आहोत? बाल मानसशास्त्र हे सांगते की मुलांना सत्य सांगावे पण त्यांना कळेल अशा भाषेत. माझा मुलगा २/३ वर्षांचा असताना एकदा आम्ही मरीन ड्राईव्हवर फिरायला गेलो होतो. वेळ रात्रीची होती आणि त्या दिवशी पौर्णिमा होती. अर्थात समुद्र उचंबळत होता. मुलाने मला विचारलं की समुद्राचं पाणी उड्या का मारतंय? मी त्याला त्या मागचे सायन्स सांगूनही त्याला काय कळले असते? पण जेव्हा मी त्याला म्हणाले की अरे तुला वाटतं की नाही चंद्रावर जावं? तसंच या पाण्याला पण वाटतंय की चंद्रावर जावं. त्याला तेव्हा ते पटलं. पुढे जेव्हा तो त्या मागचं सायन्स शिकला तेव्हा त्याला हे लक्षात आलं की चंद्राच्या किरणांचा समुद्राच्या लाटांशी काय  संबंध असतो. तो आजही मला ती आठवण सांगतो.  पण परिकथा किंवा इसापनीतित जो मतितार्थ सांगितलेला असतो तो पण महत्त्वाचा असतो. कारण इसापनीती ही मानवी स्वभावाचेच प्रतिनिधीत्व कक्रत असते. त्यातला कोल्हा हा लबाड माणसाचा प्रतिनिधी असतो. वाघ किंवा सिंह हे शूर पण तरीही सत्ता गाजवणाऱ्या माणसाचे प्रतिनिधी असतात. ही माणसे मुलांना आयुष्यात भेटणारच असतात. तेव्हा त्यांच्याशी कसे वागायचे हे या कथाच त्यांना शिकवतात. नीतिकथांचा हेतूच हा आहे की अमुक एक परिस्थिती आली तर आपण कसे वागायचे हे मुलांना समजावे. नेहेमी चांगल्याचा आणि सत्याचाच विजय होतो हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचे काम या कथाच करतात. तेव्हा त्या आवश्यक आहेत.