अभ्यास म्हणजे काय हे शाळेत शिकणाऱ्या मुलाला कदाचित कळत नसेल, पण शिक्षकांना आणि पालकांना ते नक्की माहीत असते. शाळेत किंवा अन्यत्र आपण जे काही शिकतो त्याचा सराव करणे म्हणजे अभ्यास. कधीकधी शिकलेल्या काही गोष्टी इतक्या सोप्या असतात की त्यांचा विशेष अभ्यास असा करावाच लागत नाही. गोष्ट शिकली की लगेच कार्यवाहीत आणता येते, तर काही गोष्टींसाठी खूप सराव लागतो. काहीजण शीघ्रपाठी असतात त्यांना शिकलेले विषय लक्षात ठेवायला कमी अभ्यास करावा लागतो, काहींना जास्त. पूजापाठ सांगणाऱ्या गुरुजींना मंत्रांमध्ये काना-मात्रा-अनुस्वार-विसर्गाचीही चूक चालत नाही, त्यांना सरावासाठी घोकंपट्टी करावीच लागणार. इथे घोकंपट्टी म्हणजे अभ्यास! विषय व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास केला की त्या मानाने लवकर लक्षात राहतो. अभ्यास हा एक खेळ आहे असे समजले कीही तसेच होते. अभ्यासामध्ये खंड पडला की विषयातले बारकावे विसरले जाऊ शकतात. डॉक्टर, वकील, शिक्षक आदींना आयुष्यभर अभ्यास करावा लागतो.
दोनचाकी सायकल चालवणे आणि पोहोण्यासाठी पाण्यावर तरंगणे एकदा शिकले की बहुधा, अभ्यासाशिवाय जीवनभर जमते. शास्त्रीय संगीत गायकाला मात्र रोजचा अभ्यास नसेल तर नीट गाता येत नाही.
निष्कर्ष असा की, अभ्यास म्हणजे सराव आणि केवळ सराव.