सबंध लेखामध्ये सर्व भारतीय भ्रष्ट आहेत, वारंवार उपोषण करणारे अण्णा मूर्ख आहेत आणि आपणच एकटे शहाणे आहोत असा आविर्भाव आहे तो खटकला.
भारताच्या तथाकथित स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हाला, तुमच्या पाठीशी असणाऱ्या लाखो करोडो भारतियांना कोटी कोटी शुभेच्छा
तथाकथित शब्दाचे प्रयोजन काय?
कितवी वेळ आहे हो ही? तुम्हाला असं नाही वाटत, हे जरा जास्तच होतंय?
कितवी वेळ आहे असे उपरोधाने विचारण्याचे प्रयोजन काय? त्यांना ज्या मार्गाने निषेध करावासा वाटतो त्या मार्गाने ते करताहेत. जास्त होते आहे म्हणजे त्यांनी उपोषण करणे, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणे थांबवावे का? का म्हणून? कोणी एक अतुल सोनक म्हणतात म्हणून?
आपल्या ढोंगी देशवासियांसाठी?
सगळे देशवासी ढोंगी? सगळे नसतील तर जे नाहीत त्यांच्यासाठी करताहेत असे समजायला काय हरकत आहे?
तुमची मतं बरीचशी योग्य आहेत.
कोणती योग्य नाहीत?
भ्रष्टाचार संपायलाच हवा, असं प्रत्येकालाच वाटतं. पण तो दुसऱ्याचा. आपण मात्र वेळ आली तर भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारायचा. त्याला तात्त्विक मुलामा द्यायचा. तुमच्या पाठीशी असणाऱ्या, तुम्हाला लाखो-करोडोंच्या संख्येने एस. एम. एस., मेल्स पाठवणाऱ्या आणि सशक्त जनलोकपाल बिलाचे बाजूने मतदान करणाऱ्या लोकांची चरित्रे कोणी तपासायची. आयुष्यात एकदाही भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करणारी किती माणसे तुमच्या पाठीशी आहेत? आणि आपल्या ढोंगी देशबांधवांसाठी आमरण उपोषण करून सशक्त जनलोकपाल विधेयक संमत होवून देशासमोरचे सर्व प्रश्न सुटतील, अशी तुम्हाला खात्री आहे का? आम्ही असे कर्तुत्ववान लोक आहोत की तुमच्या सशक्त लोकपालाला (मग तो एकटा असो, दुकटा असो, की सात जणांचे मंडळ असो) असे काही गुंडाळून ठेवू की कुठून आपण लोकपाल पद स्विकारले असे त्याला/त्यांना वाटेल.
मुद्द्यामध्ये थोडेफार तथ्य आहे. अण्णांना पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्येही थोडे लोक भ्रष्ट्राचारी असतील. पण त्या थोड्या लोकांसाठी बऱ्याचश्या प्रामाणिक लोकांना वाऱ्यावर सोडायचे? बाकी भ्रष्ट्राचाराच्या प्रमाणात शिक्षा असावी हे सांगणारी एक इंग्रजांच्या काळातली गोष्ट वाचली होती.
त्या काळात एका वाहतूक पोलिसाला चार आण्याची लाच घेतली म्हणून इंग्रज कलेक्टरने बडतर्फ केले. त्यावेळी डेप्युटी कलेक्टर एक मराठी गृहस्थ होते, त्यांच्याकडे तो हवालदार गेला आणि नोकरी वाचवण्याची विनंती केली. त्या गृहस्थांनी तू घरी जा, मी बघतो काय ते असे सांगितले. दुसऱ्या दिवशी डेप्युटी कलेक्टर कचेरीत गेले आणि हाताखालच्या सर्व लोकांचे राजीनामे लिहून घेतले. स्वतःचा राजीनामा लिहिला आणि कलेक्टरकडे गेले आणि त्याला सांगितले "कचेरीतल्या सर्वांचे राजीनामे मी स्वीकारले आहेत, माझा राजीनामा तुम्ही स्वीकारा आणि तुमचा राजीनामा गवर्नरकडे पाठवून द्या. " कलेक्टरने गोंधळून विचारले "हा काय प्रकार आहे? " डेप्युटी कलेक्टर म्हणाले "काल वाहतूक पोलिसाने चार आण्याची लाच घेतली म्हणून त्याला बडतर्फ केलेत. पण आपल्यापैकी कोण स्वच्छ आहे? तुम्ही आणि मी दौऱ्यावर जातो तेव्हा लोक आपला पाहुणचार करतात ती लाच नव्हे काय? म्हणून मी हे सर्व केले. " कलेक्टरसाहेब सर्व काही समजले आणि त्यांनी त्या हवालदाराला कामावर रुजू करून घेतले.
भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नसतो. तुमच्या-आमच्या मनात असतो. तुमची-आमची मनं स्वच्छ केल्याशिवाय कितीही लोकपाल नेमले तरी भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, असं मला वाटतं. आपल्या देशात नैतिक शिकवण देणारे हजारो संत-बाबा-महाराज-अम्मा-धर्मगुरू-मुल्ला-मौलवी-पाद्री हे सर्व मिळून आमची नीतिमत्ता उंचावू शकले नाहीत आणि तशी शक्यताही मुळीच दिसत नाही. तुमचा मार्ग चुकीचा वाटत असला तरी सुद्धा तुमचा प्रामाणिक प्रयत्न बघून मला तुम्हाला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. तुमच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला हार्दिक शुभेच्छा!!!!
हेही तितके खरे नाही. आज कायद्याचा बडगा नसता तर चोऱ्या, दरोडेखोरी, बलात्कार, खून अश्या गुन्ह्यांचे प्रमाण कितीतरी जास्त दिसले आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त दिसते त्याची कारणे १. असलेले कायदे जुने असल्याने अपुरे आहेत. तेलगीने ३८००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला किंवा राजांनी पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार केला. इतक्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यांना काय शिक्षा करायची हे कायद्यात नाही त्यासाठी कायदे बदलले पाहिजेत. २. काही मोठ्या पदावरील लोक कायद्याच्या कक्षेत सध्या येत नाहीत. बहुधा इंदिरा गांधी १९७५ साली दोषी ठरल्यानंतर पंतप्रधानांना भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी कायदा बदलला. म्हणूनच बहुधा अण्णा लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधानांचाही समावेश अशी मागणी करताहेत जी योग्य आहे. ३. या बदललेल्या आणि विस्तारित कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि त्यात भ्रष्टाचारी सामान्य मनुष्य असो की पंतप्रधान, कोणाचाही अपवाद नसावा या मागण्या योग्य आहे आणि त्यासाठी अण्णांना माझा मनापासून पाठिंबा आहे.
विनायक