आपण नेमके कुठे चाललो आहोत हेच कळत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांना असा भारत नक्कीच अभिप्रेत नव्हता. पण सध्या स्वतःच्या पोळीवर तूप ओढण्यात दंग असणाऱ्या नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना हे कधीच कळणार नाही. अशा भ्रष्ट नेत्यांसाठी आजही सीमेवर सैनिक आपले प्राण देत आहेत. आता सामान्य माणसालाच काहीतरी करावे लागणार आहे. नेता निवडून देताना आपणच सतर्कता दाखवायला हवी. नको असलेला नेता किंवा लोकप्रतिनिधी निवडून न देता 'निगेटिव्ह व्होटिंग' करायची हिम्मत आपण दाखवली पाहिजे. जिथे जिथे अन्याय, अत्याचार दिसेल तिथे तिथे आवाज उठवायला हवा. 'आपल्याला काय त्याचे हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे' असे न म्हणता हस्तक्षेप करायला हवा. कारण प्रत्येक गोष्ट कायद्याने करायची म्हटली तर आपले आयुष्य संपेल पण निकाल लागणार नाही. जिथे कायद्याने जाणे आवश्यक असेल तिथे तिथे सरकारवर दबाव आणायला हवा. असे जेव्हा होईल तेव्हाच कदाचित आपल्या पुढच्या पिढ्यांना 'सुराज्यात' जगता येईल. आपल्या मागच्या पिढ्यांनी बलिदान दिले तेव्हा आपल्याला 'स्वराज्य' बघायला मिळाले. आता आपण पायाचा दगड बनू तेव्हा आपल्या पुढच्या पिढ्यांना 'सुराज्य' मिळेल.