प्रतिसादाबद्दल धन्यवाद, पण..... नवीन
प्रे. अतुल सोनक (शुक्र., १९/०८/२०११ - ०९:१८).
प्रतिसादाबद्दल सर्व मान्यवरांना धन्यवाद. पण......मला अण्णांचे उपोषण सशक्त जनलोकपाल विधेयकासाठी सुरू आहे, हे माहित आहे. पण हे विधेयक सादर होईल का, पारित होईल का? आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी होईल का? हे माझ्यासमोरचे प्रश्न आहेत. प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. मी माझे मत थोडक्यात मांडले. अण्णा आणि त्यांच्या चमूच्या म्हणण्याप्रमाणे लोकपाल जरी नेमले गेले तरी आपली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही असे माझे म्हणणे आहे.

धेयवेडा यांना मी हे सांगू इच्छितो की लोकपालामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही कारण एखाद्या यंत्रणेने/व्यवस्थेने लोकांची मानसिकता बदलण्याची शक्यता नाही. कारण ही यंत्रणा राबवणारे आपलेच सगेसोयरे असतात आणि आपण मूलत: स्वार्थी असतो. वेळ आली की आपणही कळत न कळत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भ्रष्ट आचरण करीतच असतो. उपोषणाला/आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी बुद्धी गहाण ठेवली असे तुम्हाला वाटत नाही पण त्यांनी विवेक गुंडाळून ठेवला असे मला वाटते. जितके लोक आज अण्णांच्या पाठीशी दिसतात, त्यांनी विधेयकाचा मसुदा तरी वाचला आहे का? घटना वाचणे तर दूरच. "आम्ही म्हणू तसाच कायदा झाला पाहिजे" हे विवेकीपणाचे लक्षण नव्हे. त्यांच्या विधेयकाला शेकडो अंगाने विरोध करता येईल. पण त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

कुमारजी, तुम्हा आम्हा सर्वांना मत मांडण्याची, व्यक्त करण्याची मुभा आहेच. लादण्याची नाही. तुम्ही गल्लत करताय. अण्णा आणि चमू त्यांची मतं लादू पाहतायत. त्यांनी त्यांचे विधेयक एखाद्या खासदाराकरवी संसदेत सादर करायला काय हरकत होती?

शुद्ध मराठी, उपोषणाऐवजी दुसरा मार्ग सुचवावा म्हणता.... एकांगीऱ्हटवादी-मेरे मुर्गीकी एकही टांगवादी लोकांना दुसरा उपाय सुचवून काय फायदा? तुम्ही नमूद केलेले लोक अण्णांना संपवायला निघाले आहेत पण मी त्यांच्यासोबत नाही. सुरू झालेला संपतोच, हा सृष्टीचाच नियम आहे. राम, कृष्ण, बुद्ध, मोहम्मद, महावीर, येशू ख्रिस्त, गांधी, डॉ. आंबेडकर, डॉ. लोहिया, जयप्रकाश नारायण असे अनेक महान लोक/नेते आता भूतकाळात जमा झालेत (फक्त पुस्तकातच उरले आहेत). असो. संसद ही सार्वभौम आहेच. आपण मानू वा न मानू. कायदा तिथेच बनणार. अंमलबजावणी आपल्यालाच करायची आहे. नियम माहित असून न पाळणारे आपण भारतीय कुठल्या नव्या लोकपालाला भीक घालू हे संभवत नाही.