नाशिक - जिल्हा न्यायालयाने आता न्यायालयीन कामकाजात मराठीकरणात आणखी एक पाऊल टाकले आहे. राज्यात पहिल्यांदाच नाशिकच्या जिल्हा न्यायालयातील दररोजचे संगणकीकृत खर्डे चक्क मराठीत येऊ लागले आहेत. न्यायालयीन कामकाजातील मराठीचा हा वापर सामान्यांना दिलासा देणारा ठरू लागला आहे. न्यायालयाच्या मराठीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यावर धनादेश न वटल्याच्या खटल्याचे निकाल मराठीतून येऊ लागले आहेत. त्यानंतर कौटुंबिक खटल्याचे निकाल मराठीतून येऊ लागले. जिल्हा न्यायालयात मराठीचे स्वागत करताना कनिष्ठ आणि सत्र न्यायालयातील दावे, अर्ज, वापरातील भाषा, युक्तिवादही आणि निकालही मराठीतून होऊ लागले आहेत. जिल्हा न्यायालयातही अपील आणि रिव्हिजन मराठीतून येऊ लागले. पण जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील, रिट पिटिशन होत असल्याने आणि उच्च न्यायालयाची भाषा फक्त इंग्रजीच असल्याने जिल्हा न्यायालयाचे सर्व निकाल इंग्रजीतून होतात. न्यायालयात संगणकीकरण सुरू झाल्यावर गेल्या दहा वर्षांपासून कनिष्ठ आणि सत्र न्यायालयाचे दररोजचे खर्डे इंग्रजीतून येत होते. पण आता नव्या बदलात इंग्रजीसोबतच कामकाजाचे मराठीकरणही सुरू झाले आहे. (संदर्भ : ई सकाळ )
संपूर्ण मजकूर येथे आहे : नाशिक जिल्हा न्यायालयात रोजचे खर्डे आता मराठीतून