असे लेखन फारसे वाचण्यात येत नाही. पण कांहीजणतरी असा विचार करत आहेत व मांडत आहेत ही चांगली गोष्ट आहे. विचारमंथनाबरोबरच प्रत्यक्षात प्रयोग करून पाहाणारेही फार फार दुर्मीळ आहेत. अशांनी करून पाहिलेले प्रयोग आणि त्याचे खरोखरचे यशापयश शिक्षकांसमोर येणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या संम्मेलनांमध्ये त्यावर साधकबाधक विचार होणेही आवश्यक आहे.
जग हे एक माया आहे असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. माया या शब्दाची टिंगलही ऐकत आलो आहोत. पण या वाक्याचा खरा अर्थ आहे, ' जग हे सतत बदलत असते. ' हे एक नैसर्गिक आहे आणि कोणालाही त्याचा प्रत्यय घेता येतो. अगदी हिमालयातील एव्हरेस्टच्या उंचीत देखील फरक पडतो आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात.
"कोठलीही गोष्ट कायम तशीच राहाणार नाही, तुम्हाला बदलाला सतत सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही तयारीत राहा" असे मनावर ठसविण्यासाठी किती चांगले वाक्य आहे हे! पण टिंगलटवाळीत ही महत्त्वाची लहानपणापासून मनावर बिंबवण्याजोगी बाबच आपण फेकून दिली. हा सतत बदल खरं तर आपल्याभोवती शेकडो तर्हांनी घडत असतो. तो डोळसपणे पाहण्याची सवय लहानपणापासूनच जडली तर बदल जसा आपोआप घडतच असतो तसेच माणूसही आपल्या कर्तबगारीने घडवून आणू शकतो हेही मनावर ठसेल. अशी मनाची तयारी करण्याच्या कामात पालकांनाही अगदी बालसंगोपनाच्या काळापासून काम करता येईल व तसे करता करता हे सत्य त्यांच्याही मनावर आधी ठसले नसेल तर ठसेल.
-शशिकान्त गोखले