(संदर्भ :ईसकाळ) 

पुणे - ""मराठी अध्यापनाच्या क्षेत्रात उदासीनता, अज्ञान आणि अभिनिवेश या तीन गोष्टी सोडल्या तर मातृभाषा सोडण्याची वेळ येणार नाही, '' असे मत डॉ. न. म. जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. ग. ना. जोगळेकर स्मृतिदिनानिमित्त "मराठीचे अध्यापन - नवी आव्हाने' या विषयावरील परिसंवादात जोशी बोलत होते. डॉ. श्यामा घोणसे, डॉ. मनोहर जाधव, डॉ. सुमेधा चिंधडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ""सध्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांचा खऱ्या अर्थाने सहभाग आहे का? हाच प्रश्न आहे. गुणाधारित शिक्षण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान देत नाही, हे सिद्ध झाले आहे. ''

जाधव म्हणाले, ""मराठी विषयात केवळ पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन केल्याने चरितार्थासाठी उपयोग होत नाही. हेच लक्षात घेऊन व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने स्वीकारले आहे. मात्र, या प्रस्तावामुळे विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आणि अन्य विभागामध्ये अशा धर्तीवर कोणते अभ्यासक्रम राबविले जातात याचा आढावा घेण्याचे आदेश निघाले. ''

घोणसे म्हणाल्या, "" सध्या मराठी विषयाचे अध्यापन होत नाही. केवळ तास घेतले जातात. यातून आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षार्थी आणि तडजोडवादी करीत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये भाषा आत्मविश्वास निर्माण करणार नसतील तर त्या शिकविण्यात काहीच अर्थ नाही. ''

चिंधडे म्हणाल्या, ""शालेय स्तरावर मराठी भाषा शिकायची असते हेच मुळी अनेकांना मान्य नाही. परीक्षांअभावी मूल्यमापन होणार नसेल तर अभ्यास कशाला करायचा, हा प्रश्न उपस्थित होतो. '' डॉ. कल्याणी दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

संपूर्ण मजकूर येथे आहे: मातृभाषा सोडण्याची वेळ येणार नाही - डॉ. जोशी