या विचारांशी मी अजिबात सहमत नाही. मी आस्तिक अजिबात नाही. पण नास्तिकही नाही. दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीत मलाही कधी देव दिसला नाही. पण मला हे पटत नाही की देवाला तुमच्याकडून काहीतरी हवे असते त्यामुळे तो तुमचे वाईट करतो. देव तुमच्याकडे काही मागतो का? संत तुकारामांनीच सांगून ठेवले आहे की " नवस सायासे पुत्र होती, तरी का करणे लागे पती? " हा माणसाचा कमकुवतपणा आहे की तो आपल्यावर येणाऱ्या संकटांना घाबरून देवाला नवस बोलतो. नवस बोलल्यावर इच्छा पूर्ण झाली तर नवस पावला आणि जर नाही झाली तर देव वाईट. हा दुटप्पीपणा फक्त माणूसच करू शकतो. वाघ सिंहांना देवाने स्व संरक्षणासाठी नखे,दात वगैरे दिले आहेत. पण माणसाला त्याने असामान्य बुद्धीमत्ता दिली आहे. तिचा वापर तो  कसा करतो? वाघ सिंह भूक लागली तरच हल्ला करतात. एरवी त्यांच्यासमोरून हरणासारखे प्राणीही निर्धास्त फिरतात. हे आपण डिस्कव्हरी चॅनेल वर बघतो. पण माणूस दुसऱ्याचा घात करताना कधी विचार करतो? ही वाईट बुद्धी पशू-पक्ष्यांना नाही म्हणून ते सुखी आहेत‌. सर्वात महत्त्वाचे. " देव दानवा नरे निर्मिले" असे केशवसुतांनी सांगितले आहे. देवाने माणूस नाही घडवला. माणसाने देव घडवला. त्यामुळे देव जे काही चांगले किंवा वाईट घडवतो त्या माणसाच्या वृत्ती असतात.