'मी ज्यावेळी आध्यात्मिक वाटचाल सुरू केली तेव्हा निराकार (फॉर्मलेस) हा माझ्यासाठी देखील नुसता शब्दच होता, मी देखील पिंजऱ्यात अडकल्यासारखाच होतो.
मला ही कुणी प्रत्यक्ष गुरू नव्हता, मी स्वतः अनेक ध्यानप्रणालीतून गेलो, अनेकानेक पुस्तकं वाचली, मग स्वतःचं आकलन जीवनातल्या एकेका प्रसंगावर वापरून बघत गेलो आणि मग मला जो उलगडा झाला तो अंतिम होता.
मी एक मात्र करत गेलो, एक बंधन सुटलं की सुटलं, वेळ हा भास आहे म्हणजे आहे, मी रोजच्या जगण्यात तो उतरवला, मला घड्याळ वापरायचं सोडून वीस वर्ष झाली, नाती ही मानवी कल्पना आहे म्हणजे आहे, त्यामुळे मला संसाराचा कधी अडसर वाटला नाही, संन्यास घेण्याची गरज वाटली नाही, माझ्या आकलनापासून मी कधीही मागे फिरलो नाही. त्यामुळे ज्या क्षणी आपण सत्य आहोत हा बोध झाला त्या क्षणी माझे सगळे प्रश्न संपले.
सुरूवातीला सर्व ज्ञान ही माहितीच असते पण तुम्हाला ती माहिती पटली तर आयुष्यात उतरवायची असते. तुम्हाला ज्ञान प्रत्यक्षात उतरवायचं असतं.
सत्याची एक सुरेख व्याख्या झेनमध्ये आहे : ट्रूथ इज समथिंग दॅट वर्क्स! जे हरघडी तुम्हाला कामी येतं, स्वस्थ करतं ते सत्य!
निसर्गदत्त महाराजांनी म्हटलंय सत्य गवसल्याची एकच खूण आहे : 'निश्चींतपणा, आनंदाची जाणीव आणि उत्साह!'
संजय