शालेय अभ्यासक्रम हे एक कारण आहेच, पण अजून एक कारण आहे. जो जो मागे मागे जावे, तो तो त्या त्या व्यक्तींबाबतचे वस्तुनिष्ठ पुरावे कमी कमी होत जातात. नि केवळ दंतकथा नि त्याला चिकटून येणारे ग्लॅमर मोठेपणा मिरवते. एरवी एका युगातल्या रामायणातला हनुमान कित्येक वर्षांनंतरच्या दुसऱ्या युगातल्या महाभारतातल्या भीमाचे गर्वहरण करताना दिसला नसता. शंकर-पार्वतीच्या विवाहातही गणेशाचे पूजन केले गेल्याचे संदर्भ देणाऱ्या आपल्या पुराणांनी वास्तवापेक्षा दंतकथाच जास्त प्रसृत केल्या. आपण सूर्य ही देवता मानतो, किती जणांना त्याच्या पायात इराणी पद्धतीचे बूट आहेत हे माहित असेल? ज्यांनी कोणार्कचे सूर्य मंदिर अभ्यासकाच्या भूमिकेतून पाहिले असेल किंवा मूर्तिविज्ञानावर वाचन केले असेल, त्यातल्या काहींनाच हे माहित असेल.

आजच्या काळात जरी पाहिले तरी हेच दिसते. शरद पवार, लालूप्रसाद नि त्यांच्यासारख्या कर्तबगार पण तितकयाच वादग्रस्त, संशयास्पद राहिलेल्या व्यक्तींशी संबंध असल्याचे कित्येक जण सांगतात. शेवटी जेथे पुरावा नाही, त्याबद्दल आकर्षण कायमच असते नि दंतकथांचे आवरणही. यातल्या सर्वांचीच आयुष्य बोधप्रद असतील असे मात्र मी म्हणणार नाही. वस्त्रविहीन अवस्थेत जेवायला घालण्याची ईच्छा व्यक्त करणाऱ्या देवतांकडून कसला बोध घ्यायचा. फारतर माशीलाही गुरू मानणाऱ्या त्याच देवतेला आपण बोधदाता म्हणू या. शेवटी आपला विवेक महत्त्वाचा.