>मला असे म्हणायचे आहे की तुमचा लेख वाचल्यानंतर तुम्ही लेखात लिहिलेल्या गाभ्यानुसार त्याचा अर्थ लावण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया मनात सुरू होते. त्याचे विश्लेषण सुरू होते व नंतर बराच काळ, बरेच दिवसही अनेकदा अधून मधून वाचलेलं आठवत राहतं आणि मन त्याच्या विश्लेषणात रमतं. ह्याअर्थी मी विचार वाढतात असे म्हटले होते, आणि पुढे स्मायली टाकला होता पण तो उमटला नाही. गैरसमज नसावा.
=

धन्यवाद! पण विश्लेषण नाही आचरण व्हायला हवे. ओशोंचं एक अफलातून वाक्य सांगतो जे मला अत्यंत उपयोगी ठरलं : ‘समझ आचरणमे बदल जाती है! ’

>"कार्योन्मुखता.... ठेवण्यासारखं आहे. "

हा बेसिक थ्रेड आहे. तुम्ही हे वाचल्यावर तुमचे काय विचार सुरू झाले?

सांगतो. उदा. सदर लिखाण वाचल्यानंतर "काहीतरी घडावं, असं खरंच सदैव वाटतं का? " याचा विचार सुरू होतो. मग तो विचार भरकटत जातो. पुन्हा मध्येच लक्षात येते की अरे आपण तर अमुक अमुक विचार करत होतो. प्रामाणिकपणे सांगतो की अजूनतरी मला विचारांकडे त्रयस्तपणे पाहता आलेले नाही. त्यामुळे दोन विचारांमधला अवकाश मला अद्याप लक्षात आलेला नाही. विचारांकडे पाहणे हाही माझ्यादृष्टीने एक विचारच सुरू होतो. विचार न करता विचारांकडे कसं पाहायचं हे मला जमत नाही, किंबहुना समजलेलंच नाही.

= विचारांकडे पाहा हा एक फार मोठा आध्यात्मिक गोंधळ पूर्वीच्या लोकांनी (इन्क्लूडिंग ओशो) घालून ठेवला आहे आणि यात लोकांचा बराच वेळ गेला आहे. मी तुम्हाला स्वत: शोधलेली आजमितीला जगातली सर्वोच्च साधना सांगतो ‘सरळ समोर पाहा! ’ तुम्ही तत्क्षणी विचारातून मोकळे व्हाल. मी कुणाही दिग्गजाशी यावर काहीही बेट घ्यायला तयार आहे. विचार करायला मान थोडीशी तिरपी (बहुतेक वेळा उजवीकडे) करायला लागते, ज्याक्षणी तुम्ही मान सरळ करता विचार थांबतात. आता विचार थांबतात म्हणजे काय होतं? तर तुम्हाला समोर आहे ते सुस्पष्ट दिसायला लागतं आणि जे आजूबाजूला चालू आहे ते नीट ऐकू यायला लागतं. एरव्ही (म्हणजे विचार चालू असताना) आपल्याला दिवास्वप्न पडत असतं, भलतीच दृश्य डोळ्यासमोर तरळत असतात आणि त्या दृश्यातल्या व्यक्तींशी आपला संवाद चालू असतो. हे समोर बघता क्षणी थांबतं, आता जिथे असाल तिथे करून पाहा.

>वेळ हा भास आहे - पूर्वीच्या लेखात मी प्रथमतः हा विचार वाचल्यानंतर खूपच उत्तेजित झालो. काहीतरी नवीन हाती लागल्याचा आनंद झाला. हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. हा प्रयत्न म्हणजे मनाच्या पातळीवर, विचार करून समजून घ्यायचा प्रयत्न, जसे आपण एखाद्या गणिताची विचारपूर्वक उकल करतो तसे. पण त्याची उकल काही होत नाही व वेळ हा भास आहे हे तांत्रिक दृष्ट्या कळूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. (म्हणजे वेळेची जाणीव आहे तशीच राहते). असेच प्रत्येक बाबतीत घडते. समजते पण आकलन होत नाही.

= वेळेची जाणीव मलाही असते पण वेळेचं दडपण नसतं. मी जितका स्वस्थ सकाळी नऊला असतो तितकाच रात्री दोनला किंवा पहाटे चारला असतो. वेळ हा भास आहे हे लक्षात आल्यानी माझ्यावर वेळेचा परिणाम होत नाही, मी जाणीवेच्या अनुरोधानी जगतो म्हणजे भूक लागली की जेवतो आणि झोप आली की झोपतो, कंटाळा आला की काम करतो, फिरायला जातो, योगासनं करतो किंवा मग कि-बोर्ड वाजवतो, पिक्चर बघतो किंवा माझ्या पार्टनर्सना वेळ असेल तर खेळायला जातो, हो आणि एकदम बेसुमार मूड आला की  असं लिहितो आणि मग तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात रंगून जातो, बस इतकं साध आहे.

>मग स्वतःचं आकलन जीवनातल्या एकेका प्रसंगावर वापरून बघत गेलो आणि मग मला जो उलगडा झाला तो अंतिम होता.
मला वाटते, हीच पायरी निर्णायक आहे. सर्वच "बोधी" व्यक्तींनी हेच केलं आहे, पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा! आणि प्रत्येकाने तो स्वतःच शोधलेला वा गवसलेला, पण कॉपी न करता येणारा. त्यामुळेच तुमचा मार्ग माझ्या दृष्टीने फक्त मार्गदर्शक, त्यावर चालून मला बोध येणे केवळ अशक्य..

यू मस्ट राईड द बाइक योरसेल्फ! तोल आपोआप कसा सांभाळला जातो ते स्वतःचे स्वतःच अनुभवावे लागते आणि "तेव्हाच" कळते. त्याआधी असे कितीही सांगितले की तोल आपोआप सांभाळला जातो, तुम्हाला काहीही करावे लागत नाही (ऊ. निराकाराचा बोध ) तरी ते कळणे केवळ अशक्य!

= येस, काय असेल मार्ग? तर ज्याचा सर्वात जास्त त्रास वाटतो ती गोष्ट प्रथम सोडवा! मला काय त्रास वाटत होता? चार गोष्टी : वेळ, पैसा, नातं आणि रोजचं काम! मला वाटतं जगातल्या बहुतेक सर्वांना हेच त्रास असावेत. कसे सोडवले मी हे प्रश्न? वेळ : भास आहे, पैसा : कल्पना आहे, नातं : मान्यता आहे आणि काम : रसपूर्ण व्ह्यायला हवं (कसं ते या लेखात लिहिलंय)

> संजयजी,

तुम्ही कसे प्रयोग केले ते सांगितले तर कदाचित काही दिशा मिळेल. जसे "काळ हा भास आहे" ह्याचे आकलन होण्यासाठी काय करावे? मला व्यक्तिशः तांत्रिकदृष्ट्या हे पटले आहे, पण पूर्ण उलगडा होत नाही. मला वाटते, अशा कुठल्याही एका आकलनाने "लिंक" ओपन होईल व पुढची कनेक्टीव्हीटी मिळेल. सुरुवातीचे "एकच" आकलन होणे आवश्यक आहे

= सर्व गोष्टी आता मी सांगितल्या आहेत!

> एक महत्त्वाचं सांगायचं राहीलं.

खरोखर हेवा वाटावा असंच तुमचं जगणं आहे. आम्हाला कधी आकलन होईल, कोण जाणे. पण खरेच तुम्ही तुमचे अनुभव/ज्ञान ओपनली शेअर करताय हे आमचे नशीबच (नशीबावर विश्वास नाही, पण पर्यायी शब्द माहीत नाही). मी तर "मी असा झालो तर" तर काय बहार येईल, या कल्पनेतच रंगून जातो. काहीतरी करा व आम्हाला तुमच्यासारखे बनवा.

= हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्या धर्मगुरुनी तुम्हाला सांगीतलंय, अमक्याला शरण जा किंवा मला शरण या (कृष्ण), तुमच्या चिंता देवावर किंवा माझ्यावर सोपवा; हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे यानी आपण केव्हा तरी उजाडेल, त्याची कृपा होईल, तो माझी काळजी वाहेल असल्या भ्रमात राहतो. मी तुम्हाला माझ्यसारखं बनवू शकत नाही, इट इज इंपॉसिबल! मी फक्त दोनच गोष्टी करतो: एक, तुम्ही सत्य आहात हे निर्विवादपणे तुम्हाला सांगतो आणि मला सत्य कसं गवसलं ते सांगतो, प्रयत्न तुम्ही तुमच्या बुद्धीनी आणि तुमच्या आयुष्यात करायचा आहे! तुम्हाला तुमचं आयुष्य आहे त्या परिस्थितीत आणि असाल तिथे मजेचं करायचंय आणि ते झालं तर मला आनंद आहे.

संजय