>.... म्हणजे व्यक्तिमत्वातून मोकळीक, यालाच तर "शरण येणे" म्हणता येइल ना?
= शरण किंवा समर्पण हे भक्तीमार्गातले उपाय आहेत, ज्ञानमार्गातले नाहीत त्यामुळे मी त्यांचा पुरस्कार करत नाही.
जर सत्य ही निर्वैयक्तिक स्थिती आहे तर कोण कुणाला शरण जाणार? तो उगीच भास आणि भ्रम असेल; ऐनवेळी जर मनाजोगतं घडलं नाही तर पुन्हा स्वत:ची समजूत काढावी लागेल, अरे! त्याच्या मनात नव्हतं!
मी तुम्हाला जास्त उपयोगी गोष्ट सांगतो ‘प्रयास आणि निष्प्रयासातला बॅलन्स साधा! ’ हे एकदम नजाकतदार आणि समजून घेण्यासारखं आहे.
अस्तित्व हे आकार आणि निराकार यांचं मिळून बनलंय, निराकार अपरिवर्तनीय आहे आणि आकारात सतत बदल आहे, हा बदल रहस्यमय आहे, अनप्रेडिक्टबल आहे.
जीवनात एक मोठं टेंशन या आकारातल्या बदलाच्या (किंवा प्रसंग अथवा घटना काय रंग घेईल याच्या) अगम्यतेमुळे आहे. विज्ञानाचा सारा प्रयास घटनाबदलाची प्रक्रिया प्रेडिक्टबल करण्याचा आहे पण ते असंभव आहे आणि त्यामुळे आईंस्टाईननी म्हटलंय 'आय वुड रादर बिकम अ प्लंबर दॅन अ सायंटिस्ट इन माय नेक्स्ट लाईफ'! कारण त्या रहस्याचा उलगडा होत नाही.
भक्तीमार्गात हा प्रश्न समर्पणानी सोडवण्याचा प्रयत्न झालायं ‘त्याची इच्छा! ’ पण तो निव्वळ भ्रम आहे कारण मग प्रयत्न करायचा की नाही? आणि केला तर किती? हा सर्वात भेदक प्रश्न नवी अस्वस्थता निर्माण करतो.
माग काय असेल याचं उत्तर? कशी घालवता येईल ही कृत्यातली अस्वस्थता? तर दोन गोष्टी -
एक : ‘आपण निराकार आहोत, आपण सत्य आहोत, आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत आपल्यावर घटनेचा किंवा प्रसंगाचा कोणताही परिणाम होत नाही हे आकलन, आणि
दोन : घटना किंवा प्रसंग अनाकलनीय आहेत, केव्हाही काहीही घडू शकेल, आपण कुणी ब्लेस्ड वगैरे काही नाही, आपल्यावर कुणाचं कृपाछत्र वगैरे नाही, प्रसंग आपल्यावर पण बेतू शकेल याची पुरेपूर जाणीव!
काय होईल या दोन गोष्टी जमल्याकी? तुमच्या जगण्यात सहजता येईल, तुमचा प्रयत्न शास्त्रज्ञासारखा तीव्र आणि प्रकृतीशी संघर्ष करणारा होणार नाही किंवा मग भक्तासारखा भोळसट, म्हणजे ‘तो करतो, मी काहीच करत नाही’ असा संभ्रमाचा होणार नाही. तुम्ही घटना घडणार असेल तर ती घडायला आवश्यक असेल तेवढाच प्रयत्न कराल किंवा घटना घडणार नसेल तर ती न घडण्यासाठी हवा तितकाच विरोध कराल, ते करतांना तुमचा स्वत:शी संपर्क तुटणार नाही आणि मग घटना काहीही असो आणि तिचा परिणाम काहीही होवो, तुम्ही मजेत रहाल!
संजय