१) तुम्हाला जन्मभर उपयोगी होईल अशी गोष्ट सांगतो, आपलं अस्तित्व फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती म्हणजे 'हा आता चालू असलेला श्वास'! कळतंय तरी का आपल्याला? ही अस्तित्वाची कार्यपद्धती आहे! त्यामुळे आगदी तुरळक घटना (भूकंप, ज्वालामुखी, प्रलय वगैरे) सोडल्या तर अस्तित्वाची कार्यपद्धती ‘निष्प्रयास’ आहे, म्हणजे अस्तित्वं कुठे जोर लावतंय असं दिसत नाही.

जगतांना जर तुम्ही प्रत्येक क्षणी फक्त हवा तितकाच प्रयास केलात तर तुम्ही निसर्गाशी लयबद्ध असता. बोलतांना, चालतांना, कोणतीही क्रिया करतांना हे भान ठेवा. काय असेल निसर्गाविरूद्ध जाण्याचा क्रायटेरिआ? आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला की समजायचं आपण चुकीच्या दिशेनी चाललोयं! दोन्ही स्तरांवर लक्ष ठेवा, मानसिक आणि शारीरिक, ज्या क्षणी तुम्हाला त्रास जाणवायला लागेल तेव्हा समजा आपण स्थितीकडून व्यक्तीकडे वाटचाल करतोयं.

२) जोपर्यंत पैसा हीच जीवनाची दिशा आहे तोपर्यंत अनिवार्यता राहणारच, याचं कारण फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे अस्तित्वाची दिशा आनंद आहे आणि मानवाची दिशा पैसा आहे. पैसा ही मानवी कल्पना आहे, सोय आहे, आनंदही वास्तविकता आहे. तुम्ही जोपर्यंत ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून निर्णय घेत नाही तोपर्यंत पैसा प्रथम आणि तुम्ही दुय्यम राहणार.

तरीही मी तुम्हाला दोन पर्याय सांगतो:

एक, तुम्हाला रोजचा त्रास असेल तर उद्याच्या उद्या तुम्हाला हव्या तशा नव्या नोकरीचा शोध सुरू करा. यानी दोन फायदे होतील, आहे त्या नोकरीचा त्रास कमी वाटेल आणि दोन नव्या नोकरीनं तुमचा रोजचा त्रास कमी होईल.

दुसरा उपाय : कोणताही त्रास परिस्थितीनी जितका होत नाही तितका आपल्या रिजेक्शननी होतो. मी म्हटलं तसं प्रत्येक काम न्यूट्रल आहे, आहे त्या कामात तुम्ही नक्की काय आणि कशासाठी रिजेक्ट करताय ते पाहा आणि ते फॅक्टर्स एकतर मंजूर तरी करा नाही तर बदला, तुम्हाला आहे त्या कामात मजा यायला लागेल.

आणि हो, काय केलत ते कळवा!

 

संजय