>एक शंकाः तुम्ही म्हणता तो निराकाराचा बोधच जर मला अजून होत नसेल तर... तुम्ही सांगितलेले उपाय करणे हे तर वाघाचे कातडे पांघरल्यासारखे नाही का होणार?
हा निराकाराचा बोध मला का होत नाही? मला खराखुरा वाघ व्हायचंय, वाघाचं कातडं नाही पांघरायचं.
= मी तुम्हाला पहिल्या लेखाच्या पहिल्याच वाक्यात सांगीतलंय की तुम्ही सत्य आहात, आध्यात्मिक प्रवासातला पॅराडॉक्स असा आहे की ‘स्थितीच स्थितीला येण्याचा प्रयत्न करतेयं. अ स्टेट इज वॉंटिंग टू अलाइन विथ इटसेल्फ! हे लक्षात येणं कोणतीही आध्यात्मिक साधना, किंवा सत्याविषयी कोणतीही कल्पना किंवा धारणा बनवण्यापूर्वी अत्यंत अगत्याच आहे. एकेक चुकीची धारणा निस्सरित करायला सॉलिड प्रयास पडतो.
आजपर्यंत आपला असा गैरसमज करून दिला आहे की सिद्धाचं लक्षण सिद्धी किंवा चमत्कार आहे, तो मुंगीच्या मनातलं जाणेल, भींत चालवेल, सदेह वैकुंठाला जाईल, सूक्ष्म देहानी अवकाश भ्रमण करेल, अमक्या युगात तमका अवतार घेईल. एक तर हे सर्व भ्रामक आहे आणि तुम्ही एक साधा विचार करा, काय उपयोग आहे असल्या गोष्टींचा रोजच्या जगण्यात?
सत्य ही निर्विषेश स्थिती आहे आणि ती सर्वांना सर्वक्षणी सारखी उपलब्ध आहे मग कशाला हवी विशेषता? ही निराकार स्थिती न गवसण्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं त्या स्थितीची दखल न घेणं. सत्य काही गुह्य गोष्ट नाही ती देह आतबाहेर व्यापून खुद्द डोळ्यासमोर या क्षणी स्थित आहे पण आपली नजर सतत आकारावर लागलीये, फक्त एका क्षणी ही तुम्हाला सतत घेरून राहिलेली व्यापकता कळायचा आवकाश आहे की झालं काम! कारण मग पुढची पायरी आपसूक आहे, 'ती स्थिती आणि आपण एकच आहोत' म्हणून तर मी म्हणतोयं की आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला की आनंदी आनंद. तुम्ही माझं लेखन स्क्रीनवर वाचू नका, माझं लेखन आणि प्रतिसाद एकेका पानावर कॉपी करून त्याचे व्यवस्थित प्रिंटाउटस घ्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निवांतपणे सतत वाचत रहा, तुम्हाला कळेल की साऱ्या अस्वास्थ्याचं कारण केवळ एक साधा गैरसमज होता.
संजय
sanjayunlimited@yahoo.com