... याकरिता सावरकरांच्या (किंवा खरे तर कोणाच्याही) दाखल्याची आवश्यकता आहेच काय?

म्हणजे, 'पचेल रुचेल ते खावे' हे स्वतःच्या विचारांतून/आवडीतून/अनुभवांतून आलेले पुरेसे नाही काय? त्याला त्रयस्थाच्या आधाराची गरज काय?

नाहीतर 'एखादे महाराज/गुरू/सद्गुरू मांसाहार करीत नाहीत, म्हणून मी किमानपक्षी त्यांच्या ठराविक दिवशी तरी मांसाहार करणार नाही' अशा प्रकारच्या (लेखकाच्या) विधानात नि या विधानात फरक काय राहिला?

शाकाहार आवडत असेल, तर शाकाहार करावा. मांसाहार आवडत असेल, तर मांसाहार करावा. दोन्ही आवडत असेल, तर दोन्ही करावे. यातले काही नसेल आवडत, तर जे आवडत नाही ते करू नये. पण 'अमूक महाराज करत नाहीत म्हणून मांसाहार करू नये' किंवा 'सावरकर सांगतात म्हणून मांसाहार करण्यास हरकत नाही', हे काही पटत नाही.

(सावरकरांनी तर (हिंदूंनी) गोमांसभक्षण करण्याससुद्धा प्रत्यवाय नसावा अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे, असे ऐकिवात आहे. (प्रत्यक्ष युक्तिवाद वाचलेला नाही. कदाचित पुढेमागे वाचेनही.) आता या आर्ग्युमेंटात वरकरणी तरी तार्किकदृष्ट्या चूक असे काहीही जाणवत नाही. परंतु, सावरकरांच्या या दाखल्यावर जाऊन किती सावरकरभक्तांनी गोमांसभक्षण करण्यास सुरुवात केली असावी, याबद्दल साशंक आहे.

अर्थात, बहुसंख्य सावरकरभक्तांनी सावरकरांचा युक्तिवाद ऐकून गोमांसभक्षण करावयास सुरुवात केलेली नसल्यास त्यात काही गैर आहे, असा दावा नाही. कारण सावरकर काहीही म्हणोत, प्रत्येकास आपल्याला जे रुचेल तेच खाण्याचा आणि योग्य वाटेल तसेच आचरण्याचा अधिकार आहेच. त्याबद्दल वाद नाही. परंतु, अशा परिस्थितीत 'हिंदूंनी गोमांसभक्षण करण्यास काहीही प्रत्यवाय नसावा, असा युक्तिवाद सावरकरांनी केला होता', या बाबीस काहीही महत्त्व राहत नाही, एवढेच मांडायचे आहे.

उलटपक्षी, हिंदूंपैकी जे गोमांसभक्षण करतात, ते (१) सावरकरवादी अथवा सावरकरभक्त असतात, आणि/किंवा (२) सावरकरांचा युक्तिवाद त्यांना आवडला आणि/किंवा पटला म्हणून ते गोमांसभक्षण करतात, आणि/किंवा (३) गोमांसभक्षणासाठी ते सावरकरांच्या युक्तिवादाचा आधार घेतात अथवा अशा आधाराची त्यांना गरज असते, असेही म्हणता येणार नाही. असे विधान केल्यास ते सयुक्तिक होणार नाही, आणि तथ्यास धरून तर होणार नाहीच नाही.

सबब, आपल्यास जे योग्य वाटते ते करण्याकरिता (१) सद्गुरूंच्या - अथवा सावरकरांच्या/गांधींच्या/अन्य कोणाच्याही -आधाराची गरज असू नये, आणि (२) सद्गुरूंच्या - अथवा सावरकरांच्या/गांधींच्या/अन्य कोणाच्याही सबबीची गरज तर असू नयेच नये, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.)