आपल्यास जे योग्य वाटत नसते, तेही हातून घडते. नव्हे, आपलेच मन हिटलरशाही करून क्षणिक मोहापायी, फॅशनपायी तसे करायला भाग पाडते. याला प्रज्ञापराध असे म्हणतात. सुदैवाने तो लक्षात आला आणि मनाला डाचायला लागला तर 'मी(च) शहाणा आणि माझे(च) सवडीशास्त्र बरोबर' या मूलभूत अंधश्रद्धेला हादरा बसतो. निव्वळ सवडीशास्त्र, 'अपनी धून मे रहने वाला मस्त मौला' वगैरे वरपांगी, उथळ प्रकार सोयिस्कर आहेत, मात्र ते खरोखर इहपर हिताचे आहेत का असा प्रश्न पडल्यावरच (जो एखाद्यालाच पडतो) माणूस एखाद्या मार्गदर्शकाकडे वळतो. 'आतला गुरू' काम करत नाही, गोंधळून जातो तेव्हा बाह्य गुरूची गरज अनिवार्य ठरते. मन, बुद्धीच्या अशा अवस्थेतच अमुक एक विषयात काही अधिकार असू शकेल अशा व्यक्ती काय म्हणतात हे समजावून घेणे खचितच मोलाचे वाटते.
सुदैवाने योग्य मार्गदर्शन मिळाले, ते आपल्या हिताचे आहे असे त्याला वैचारिक, भावनिक पातळीवर पटले आणि व्यवहारात आणता येईल असेही वाटले तरच वैचारिक घोळ संपतो. तो आपले आचरण मनोमन पटलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे घडवण्याच्या मागे लागतो. दृढ श्रद्धा ठेवून मन मोडून मन घडवण्याच्या मागे लागतो. यालाच मी दुग्धशर्करा योगाप्रमाणे कृष्णार्जुनयोग असे म्हणेन. (यातही व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने कुणा एकाचे मार्गदर्शन सगळ्या जगाला पटेल असे होऊ शकत नाही. उदा. मला रमण महर्षी आणि श्री. शशिकांतरावाना स्वा. सावरकरांचे विचार मनोमन पटलेले आहेत. )
हे सगळे ध्यानात घेता आपल्याला वाट्टेल ते बिनधास्तपणे करावे असा आग्रह सरसकटपणे धरणे सयुक्तिक ठरत नाही. कारण ते देखील तसा पिंड असलेल्यालाच रूचेल आणि पटेल. त्यामुळे कुठल्याही बाबतीत मत मतांतरे नि:संकोचपणे व्यक्त व्हायला हरकत नसावी. असो.