लेखकाला ' मांसाहार करावा कि करू नये' यावर चर्चा हवी असावी. 'माझा' शब्दावरून बराच शब्दच्छल झालेला दिसतो. माझ्या प्रतिक्रीयेतील एका उल्लेखावरून श्री. टगे यांनीही बरेच कांही लिहिले आहे. सर्व प्रतिसादांनंतर हा माझा पण प्रतिसाद!
'रुचेल पचेल ते खावे' हे सुटसुटीत सूत्र ' म्हणून लक्षात होते, पटले होते, म्हणून ज्याच्या लिखाणात ते वाचले ते नाव लिहिले एवढेच. टग्यांच्या लिखाणात वाचले असते तर तसे लिहिले असते. कोणतीही गोष्ट 'श्रुतिस्मृतिपुराणोक्त ' आहे कि नाही हे पाहिल्याप्रमाणे हा दाखला दिलेला नाही. सावरकरांच्या सहज उल्लेखावरून टगे यांनी इतके का लिहिले त्याचे कारण कळले नाही. त्यांनी सावरकरांचा मूळ युक्तिवाद वाचलेला नाही पण पुढेमागे वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे याचे मी स्वागत करतो. याबाबतीत मी प्रा. शेषराव मोरे यांनी लिहिलेली 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद' व ' सावरकरांच्या समाजकारणाचे अंतरंग' ही दोन सुटसुटित पुस्तके वाचनासाठी सुचवीन, कि ज्यातून सावरकर व सावरकरांच्या युक्तिवादाची बरीच ओळख होते. सावरकरांचे मूळ लिखाण त्यांनी वाचू नये यासाठी मी हे सुचवीत आहे असे समजू नये. मूळ लिखाण फार विस्तृत आहे म्हणून हा जवळचा मार्ग सुचवला एवढेच. त्यांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हे मी ठरवण्याचा प्रयत्न करतो आहे असा गैरसमज कृपया करून घेऊ नये.