गुरुवार जसा दत्ताचा तसाच सोमवार शंकराचा, मंगळवार आणि शुक्रवार देवीचे, शनिवार मारुतीचा, मग हे बाकीचे  काय देव नाहीत?

परंपरेनुसार शंकरास मांसाहाराचे वावडे असावेसे वाटत नाही. बाकी दत्त आणि मारुतीबाबत खात्रीलायक कल्पना नाही.

पण मुद्दा तो नाही. शंकराने, दत्ताने किंवा मारुतीने काय खावे नि काय खाऊ नये हा त्यात्या देवाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुद्दा हा आहे, की पण म्हणून आपणही त्याचप्रमाणे का खाल्ले पाहिजे? समजा दत्ताला नसेल आवडत नळी फोडायला, त्याला नको फोडू देत, पण म्हणून मीही नळी फोडू नये हे काय म्हणून? मी दत्ताला 'नळी फोड' म्हणून सांगत नाही, तसेच त्यानेही मला 'नळी फोडू नकोस' म्हणून सांगू नये. किंवा शंकराला भांग चढवायला आवडते, म्हणून मीही भांग चढवलीच पाहिजे, असे थोडेच आहे? मला जर कधी भांग चढवावीशी वाटली, तर मला वाटेल तेव्हा मी ती चढवेन, त्याकरिता शंकराचे निमित्त कशाला?

शिवाय, अमूक दिवशी अमक्याचे निमित्त करून अमूक खायचे/प्यायचे नाही आणि इतर दिवशी मात्र खायचे (किंवा अमूक दिवशी अमक्याचे निमित्त करून अमूक आवर्जून खायचे*) यालाही (लेखकाने म्हटल्याप्रमाणे) फारसा अर्थ नाही, हेही पटण्यासारखे आहे.

ड्राय डे, आंतरराष्ट्रीय मांसविरहित दिवस वगैरे संकल्पना (मला) पटत नाहीत, ते यामुळेच.

अर्थात याला दुसराही एक आयाम आहे. समजा मी एखाद्याच्या घरी जाणार आहे, आणि त्याला मांसाहाराचे वावडे आहे. अशा वेळी मी त्याच्या घरी जाऊन मांसाहार करू नये, तसा अट्टाहास करू नये, हे अर्थात शिष्टाचारास धरून आहे. मांसाहार योग्य की अयोग्य हा मुद्दा येथे उपस्थित होत नाही. एखाद्याच्या घरात जातोय म्हटल्यावर त्याच्या घरात त्याने काय चालवून घ्यावे आणि काय चालवून घेऊ नये, हे ठरवण्याचा त्याला संपूर्ण अधिकार आहे. सबब, 'मला मांसाहाराचे वावडे आहे, सबब माझ्या घरी मला मांसाहार केलेला चालणार नाही' अशी जर एखाद्याची भूमिका असेल, तर त्यावर 'नळी फोडीन तर तुझ्या घरातच' हा प्रतिअट्टाहासही योग्य नाही. याच न्यायाने, एखाद्या देवाला अथवा गुरूला मांसाहार वर्ज्य आहे अशी जर कल्पना किंवा वस्तुस्थिती असेल, तर त्याच्या दर्शनाला किंवा भेटीला गेल्यावर (पक्षी: त्याच्या देवळात किंवा घरी/सभागृहात) मांसाहार करू नये, हे ठीकच आहे. पण इतरत्र कोठेसुद्धा मांसाहार करू नये हे तर्कापलीकडचे आहे.

म्हणजे, समजा मला देवळात जायचे आहे, आणि संबंधित देवाला मांस वर्ज्य आहे अशी जर सामान्य कल्पना आहे, तर मी त्या देवळात जाऊन मांसभक्षण करू नये, हे ठीकच. पण देवळात जाताना वाटेत थांबून एखाद्या उपाहारगृहातसुद्धा मटण ओरपू नये, हे सयुक्तिक वाटत नाही. आणि इतकी जर माझ्याकडून त्या देवाची अपेक्षा असेल, तर अशा देवाच्या नादी लागण्यात (आणि त्याच्या देवळात जाण्यात) मला कितपत स्वारस्य आहे, याचा फेरविचार मला करावा लागेल.

'अमूक‌अमूक पद्धतीने वागणे असेल, तरच या, नाहीतर कायमचे कटा. (गणगोतासह.) <---- कटण्याचा रस्ता ---->' अशी (एकेकाळी पुण्याच्या जोग क्लासेसबाहेर दिसणाऱ्या पाटीसदृश) जर देवाची भूमिका असेल, तर तशी भूमिका ठरवण्याचा अधिकार देवाला निश्चितच आहे. पण मग मलाही माझे पर्याय निवडण्याचा अधिकार आहेच, नाही का?

(अर्थात, ही झाली माझी भूमिका.)

"माणूस  तोंडाने जे भक्ष्यण करतो त्याने तो भ्रष्ट होत नाही तर त्याच्या तोंडून जे बाहेर पडते त्याने तो भ्रष्ट होतो"

यात थोडा बदल सुचवू इच्छितो. "माणूस तोंडाने जे भक्षण करतो, त्याने तो भ्रष्ट होत नाही, तर त्याच्या अन्नमार्गाच्या दुसऱ्या टोकातून जे बाहेर पडते, ते भ्रष्ट असते**. आणि तोंडातून (शाकाहारी, मांसाहारी किंवा अन्य असे) काहीही भक्षण केले, तरीसुद्धा दुसऱ्या टोकातून बाहेर पडणारे हे भ्रष्टच असते."

थोडक्यात, भ्रष्टत्व हे अन्नातून येत नसून त्याचा उगम इतरत्र असावा, असा आमचा नम्र कयास आहे.

आमच्या सी. के. पी. ज्ञातीत आमच्या तुळजाभवानीला नवरात्राच्या अष्टमीला मटणाचा नैवेद्य लागतो. तो आम्ही देतो. कारण ती आमची कुलस्वामिनी आहे.

'लागतो' म्हणजे? नाही म्हणजे, तुम्ही देता हे ठीक आहे, तुम्ही काय द्यावे आणि का द्यावे हा सर्वस्वी तुमच्यातला आणि देवीतला खाजगी प्रश्न आहे, पण 'लागतो' म्हटल्यावर, समजा नाही मिळाला किंवा मिळू शकला, तर नेमके काय होते, याबद्दल कुतूहल चाळवले, इतकेच.

शिवाय, 'लागतो' म्हणजे नेमका कोणाला लागतो, देवीला की भक्तांना? कारण आपल्याला जे हवे असते त्याचे बिल देवाच्या/देवीच्या नावावर फाडण्याची मनुष्यप्राण्याची सवय सनातन आहे, आणि जागतिक आहे. त्यामुळे शाकाहारी समाजांत शुद्ध शाकाहारी असणारा, मोदकांशिवाय दुसरे काहीही न खाणारा गणपतीबाप्पा इतरत्र गेला, की आवडीने कोळंबीचा नैवेद्य मटकावतो, आणि तोही बुद्धदेवाच्या खांद्याला खांदा लावून, हे चित्रही याचि डोळां पाहिलेले आहे. अर्थात, गणपतीबाप्पाने काय खावे आणि त्याला काय आवडावे हा अर्थातच गणपतीबाप्पाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ही निवडही भक्तगण आपापल्या मगदुराप्रमाणे पण त्याच्या नावाने करून त्याच्यावर लादत असतात, हा मुद्दा आहे.

बाकी, 'अमक्याअमक्या ज्ञातीतल्या आमच्या तुळजाभवानीला' वगैरे वाचून मौज वाटली. म्हणजे, देवावरही एखाद्या ठराविक समाजाची अन्योन्य मालकी असते वगैरे कल्पना मनोरंजक आहे. अर्थात, हे प्रत्यक्षात घडते, आणि प्रत्येकच समाजाच्या बाबतीत घडते, हे खरे आहे; हा मनुष्यस्वभाव आहे. पण मग नेमका कोण कोणाचा स्वामी आणि नेमकी कोण कोणाची स्वामिनी, असा प्रश्न पडतो.

असो.

तळटीपा:

* 'अमूक दिवशी अमक्याचे निमित्त करून अमूक आवर्जून खायचे' या प्रकाराला फारसा अर्थ नसला, तरी पडणाऱ्याला याने फरक पडू शकतो, हा मात्र अनुभव आहे. उदाहरणार्थ, इतर कोणत्याही दिवशी चवीला कागदाच्या लगद्याप्रमाणे लागणारे टर्कीपक्ष्याचे मांस, थ्यांक्सगिविंगच्या दिवशी मात्र अवर्णनीय लागते, हा अनुभव आहे. अर्थात, याला आजूबाजूचे उत्सवाचे वातावरण, तसेच या दिवशी टर्कीबरोबर आवर्जून देण्यात येणारे स्टफिंग ('सारण'?), ग्रेवी  (मराठी?), 'क्र्यानबेरी' नामक फळाचा लगदा हे सर्वही कारणीभूत असू शकतील म्हणा!

** 'भ्रष्ट असते' हे अर्थात माझे मत. इतरांची मते याहून वेगळी असण्यास मला व्यक्तिशः काहीही प्रत्यवाय नाही.