तात्पर्य इतरांची मते जाणून घेणे म्हणजे मानसिक गुलामगिरी आहे असा शिक्का मारायचे कारण नाही.
आपल्याला एखाद्याचे मत काही कारणास्तव जाणून घ्यावेसे वाटले, किंवा पटले म्हणून स्वीकारावेसेही वाटले, तर तो सर्वस्वी आपला प्रश्न आहे. यात मानसिक गुलामगिरीचा प्रश्न - किंवा आरोप - कोठे आला?
(इतरांना तशी - पक्षी: एखाद्या परिस्थितीत दुसऱ्याचे मत जाणून घेण्याची - आवश्यकता वाटणार नाहीही कदाचित, पण येथे तोही प्रश्न नाही.)
मुद्दा हा आहे, की दुसऱ्याचे एखादे मत - मग ते भले सावरकरांचे असो, गांधींचे असो किंवा टग्याचे असो - तुम्ही स्वीकारलेत, ते तुम्हाला पटले म्हणूनच ना? एकदा का ते पटले आणि तुम्ही स्वीकारलेत, की मग ते तुमचे मत झाले. मग भले त्याचा उगम कोठूनही असो.
अशा परिस्थितीत, असे एखादे मत हे स्वतःचे मत म्हणून मांडण्यास काय हरकत आहे, उगमाचा दाखला हा दर वेळी देणे आवश्यक आहेच का, इतकेच कुतूहल आहे.
म्हणजे असे बघा, की तुम्ही (उदाहरणादाखल) सावरकरांचा दाखला दिलात. सावरकरांना कदाचित हा विचार उत्स्फूर्तपणे सुचला असेल, किंवा कदाचित ते दुसऱ्या कोणाचे (सावरकरांना मनोमन पटलेले) मतही असू शकेल. आता सावरकरांच्या अशा मताचा उगम कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही. समजा नसेल, तर हरकत नाही. समजा असेल, आणि त्यातून 'सावरकरांना हा विचार उत्स्फूर्तपणे सुचला' असे निष्पन्न होत असेल, तरीही हरकत नाही. पण समजा हा अन्य कोणाचा (सावरकरांना मनोमन पटलेला) विचार असेल, आणि हे तुम्हाला माहीत असेल. तर त्या परिस्थितीत तुम्ही, "अमक्यातमक्याने मांडलेल्या आणि सावरकरांना पटलेल्या विचारास अनुसरून सावरकर म्हणतात त्याप्रमाणे" अशी पुस्ती जोडणे आवश्यक ठरावे काय? आणि अशी साखळी, अशी झुकझुकगाडी किती वाढवीत नेणार?
खुद्द सावरकरांना उत्स्फूर्तपणे हा विचार सुचला नसल्यास, दुसऱ्या कोणाचातरी पण सावरकरांना मनोमन पटलेला हा विचार असल्यास, सावरकरांनी तो मांडताना किंवा त्याचा प्रसार करताना "अमूकअमूक म्हणतात त्याप्रमाणे" अशी पुस्ती दरवेळेस जोडण्याचे बंधन सावरकरांवर असण्याचे काहीही कारण दिसत नाही.
दुसरे उदाहरण घ्यायचे झाले, तर "एखाद्याने एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा" हे वचन "गांधींचे आहे" असे भारतात अनेकजण मानतात. वस्तुतः हे वचन मुळात गांधींचे नसून बायबलमधले आहे, फक्त, गांधींना ते मनोमन पटल्यामुळे त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला, इतकेच. आता गांधींचे ख्रिस्ती धर्माबद्दल किंवा बायबलबद्दल काहीही विचार असतील, बायबलमधील किंवा ख्रिस्ती धर्मातील सर्वच विचार त्यांना पटत असतील असेही नाही, पण हे एक म्हणणे काही कारणास्तव त्यांना पटले असेल. त्यापुढे, गांधी हे बायबलचे किंवा ख्रिस्ती धर्माचे प्रचारक नसल्याकारणाने, केवळ त्यातील एक मत (किंवा काही मते) त्यांना मनोमन पटल्यामुळे आणि केवळ अशाच मतांचा ते पुनरुच्चार करीत असल्याने, दरवेळेस अशी मते मांडताना "बायबलात म्हटल्याप्रमाणे" अशी पुस्ती जोडण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसावी, आणि तसे त्यांच्यावर बंधनही नसावे. परिणामी, बायबलात काय लिहिलेले आहे याचा हिंदुस्थानातील बहुसंख्यांना गंध असण्याचे काहीही कारण नसल्याने, "हे मत गांधींचे आहे" असा त्यांचा समज होणे साहजिक आहे. आणि त्यात काही गैरही नाही. कारण एकदा का गांधींनी एखादे मत मनोमन पटल्याकारणाने स्वीकारले, की ते मत त्यांचे झाले (पक्षी: त्या मताचे स्वामित्व त्यांच्याकडे आले), आणि त्या मताचे उत्तरदायित्वही त्यांच्याकडे आले, नाही का?
मग, सावरकरांनी किंवा गांधींनी असे एखादे मनोमन पटलेले दुसऱ्याचे मत मांडताना, ते मत मनोमन पटल्याकारणाने स्वीकारल्यामुळे जर त्या मताचे स्वामित्व आणि उत्तरदायित्व जर सावरकरांकडे किंवा गांधींकडे येत असेल, आणि, पर्यायाने, असे मत मांडताना दरवेळेस त्याच्या मूलस्रोताचा उल्लेख करणे हे सावरकरांवर किंवा गांधींवर जर बंधनकारक नसेल, तर मग:
तुम्ही किंवा मी असे एखादे मनोमन पटलेले दुसऱ्याचे मत मांडताना, त्या मताचे
स्वामित्व आणि उत्तरदायित्व तुमच्याकडे किंवा माझ्याकडे का येऊ नये? पर्यायाने, असे मत मांडताना दरवेळेस त्याच्या मूलस्रोताचा उल्लेख करणे हे तुम्हाला किंवा मला आवश्यक का असावे?
थोडक्यात, मत आपल्याला पटले आहे, तर 'असे मला वाटते' म्हणून बिनदिक्कतपणे मांडू या की! त्याकरिता 'सावरकरांनी असे म्हटले आहे'ची पुस्ती कशासाठी जोडायची? (मग भलेही त्या विचाराचा उगम सावरकरांकडून असो.) एवढेच म्हणणे आहे.
(शेवटी, महत्त्व कशाला आहे? मत काय आहे याला, की ते मुळात कोणी मांडले होते याला? मुळात कोणी मांडले होते यालाच जर महत्त्व असेल, तर मग त्या व्यक्तीलाच येऊन येथे प्रतिसाद टंकू देत की! आपण ते कष्ट कशासाठी घ्यायचे? पाहू या थोडेसे प्लँचेटचे प्रयोग करून; त्या निमित्ताने 'आत्मा असतो का' वगैरे गोष्टींचा तरी सोक्षमोक्ष लागून जाईल! काय म्हणता?
)
असो.