अण्णांनी तिथल्या भ्रष्टाचारप्रकरणी पाकिस्तानात जाणं ही तर भारतप्रिय देशभक्तांना विन-विन सिटुएशन ठरू शकते. कसं ते पहा.

आपल्यातला एक (भारतीय) नागरिक 'तिथे' जाऊन 'त्यांना' लेक्चर देतो. इथून लेक्चरबाजी करणारे पुष्कळ. अण्णांच्या या निधड्या छातीमुळे आम्हां देशभक्तांच्याही छात्या इंचैंच फुगणार नाहीत काय?

अण्णा त्यांचा पाहुणचार स्वीकारतात आणि वर त्यांच्याच नाकावर टिच्चून त्यांनाच खडे बोल सुनावतात. (हे खडे बोल खडी बोलीत असतील का? नसतील बहुधा. कारण तसे ते  असतील तर अण्णांची खडी बोली ऐकताक्षणीच 'ते' खड्याचे-उभ्याचे आडवे होतील. अण्णांच्या अहिंसक लढाईच्या आणि पर्यायाने भारताच्या यशात एक मानाचा तुरा. )म्हणजे गनिमी काव्याची आणि धूर्तपणाची परमावधी‌. भारतीय नागरिक हा पाहुणचारासारख्या रिश्वतीची पत्रास बाळगीत नाही, हे जगाला दिसून येईल.

तिकडे जाऊन अण्णा हे आपल्या वक्तव्यांमुळे 'पाकिस्तानीय असंतोषाचे जनक' ठरले तर ते एकाच वेळी दुसरे गांधी आणि दुसरे टिळक ठरतील. एकमेवाद्वितीय. भारतामध्ये ते लोकांच्या रोषाचे धनी न होता संतोषाचे धनी ठरले. म्हणून भारतामध्ये तरी ते 'भारतीय संतोषाचे जनक'.

पाकिस्तान सरकारने त्यांचा सत्कार केला, त्यांना धोतर-टोपी देऊन त्यांची आपल्या स्वारांसोबत वाघा सीमेपलीकडे (सन्मानाने) पाठवणी केली तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसारखेच त्यांचेही चारित्र्य परमुलुखात जाऊनही निष्कलंक राहिले असल्याने त्यांचे धवल व्यक्तिमत्व अधिक धवल होईल.(तुरळक काहींच्या पोटात ढवळाढवळ होऊन 'इनो' घेण्याची गरज भासू शकेल.. 'भला इसका चारित्र्य मेरे चारित्र्यसे सफेद क्यूं?')

चेतावनी- अण्णांची  थट्टा करण्याचा कोणताही- कोणताही हेतू नाही. पण हे सर्व प्रकरण थोडं विनोदी वाटलं खरं. 'घरचं झालं थोडं अन व्याह्यांनी धाडलं घोडं' या प्रकारातलं.