प्राचीन भारतवर्षातले संवेदनाक्षम आणि संवेदनशीलता असणारे अनेक ऋषिवर्य, तरल कवी, साहित्यिक, तत्ववेत्ते,उपनिषदोद्गाते हे मिश्राहारीच असावेत कारण त्यावेळी मिश्राहार हा जनमान्य आणि राजमान्यही होता.आपल्या अर्वाचीन भारतामध्येही नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या उच्च कोटीच्या आणि तरल प्रतिभाशक्तीच्या कवी, अर्थज्ञ, शास्त्रज्ञ यांमध्ये मिश्राहाऱ्यांची बहुसंख्या आहे.

रामकृष्ण परमहंस आणि त्यांची बहुतेक सर्व बंगाली शिष्यपरंपरा(काही तुरळक अपवाद वगळता) मिश्राहारी होती.

पाश्चात्यांपैकी अनेक सदय, सहृदय लोकोत्तर पथद्रष्टे मानव मिश्राहारी होते. पाश्चात्यांपैकी अनेक तरलबुद्धी प्रतिभावंतांनी, विचारवंतांनी,तत्त्ववेत्त्यांनी, शास्त्रज्ञांनी अनेक कूट प्रमेये उकलली, मानवी भावभावनांचे अत्यंत हृदयंगम चित्रण केले, छायचित्रण, चलच्चित्रण अश्या मानवी प्रतिभाविलास दाखवणाऱ्या तंत्रांच्या विकासातून मानवी जीवनाचे अनेक आत्तापर्यंत माहीत नसलेले पैलू जगासमोर आणले. उत्तुंग कल्पनाविलास आणि कल्पनेच्या भराऱ्या दाखवणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या हातून शक्य झाल्या. सूक्ष्म विचार करू शकण्याची क्षमता,अपयशाला न घाबरता प्रदीर्घकाळ चिकाटीने प्रयत्न चालू ठेवण्याची वृत्ती हे गुण त्यांच्यामध्ये होते.

मला वाटते, बुद्धी प्रगल्भ आणि अधिकाधिक संवेदनाक्षम होत जाण्याची कारणे वेगळीच असावीत. आहाराच्या प्रकारावर ते अवलंबून नसावे.