नॉनवेज आणि वेजमध्ये नॉनवेज शरीरात गेल्यावर तुमचं लक्ष जास्त वेधलं जातं,
त्या तुलनेत वेजची शरीराशी कंपॅटिबिलीटी सहज आहे, एकदा खाल्लं की तृप्ती की
पुन्हा समस्थिती!
'नॉनवेज'* खाणे हे काहीतरी 'वेगळे' / 'अनैसर्गिक' वगैरेवगैरे आहे हे ज्या वातावरणांत लहानपणापासून बिंबवले जाते, अशा वातावरणांत किंवा त्यांच्या सान्निध्यात** वाढलेल्या व्यक्तीकरिता हे कदाचित खरे असेलही. अशा वातावरणात वाढलेल्या मनुष्याकरिता 'नॉनवेज' शरीरात गेल्यावर लक्ष जास्त वेधले जाणे शक्य आहे.
(* 'नॉनवेज' हा असाच एक 'वेगळा' / 'अनैसर्गिक' शब्द. खास भारतीय इंग्रजीत चालणारा. अन्यथा इंग्रजीत शाकाहारी मनुष्य हा 'वेजिटेरियन' ठरावा आणि त्याचे खाणेही 'वेजिटेरियन' ठरावे, परंतु मांसाहारास आवर्जून 'नॉनव्हेजिटेरियन' अशी संज्ञा भारतीय संदर्भाबाहेर आढळल्याचे दिसलेले नाही. सर्वसामान्य माणसे खातात तो नेहमीचा - 'रेग्युलर'? - आहार, तर कारण काहीही असो, पण विशेष आहारविषयक गरजांमुळे - 'स्पेशल डाएटरी नीडज़' - जे काही थोडे जण मांसभक्षण टाळतात, ते 'वेजिटेरियन' अथवा त्यांचा आहार 'वेजिटेरियन'. 'कोशर' अथवा 'हलाल' अन्न खाणे ही समाजातील काहींची गरज असेलही, आणि असे लोक खातात त्या अन्नास 'कोशर' किंवा 'हलाल' अन्न असे संबोधणे हे ठीकच, पण बहुतांश लोकांची ती गरज ज्या समाजांत नसते, त्या समाजांच्या संदर्भात आणि भाषांत सर्वसामान्यांचे अन्न हे 'नॉन-कोशर' अथवा 'नॉनऱ्हलाल' म्हणून संबोधले जात नाही, तद्वत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात अनेक मुसलमान आहेत, काही ज्यूही आहेत, ते त्यांच्या पद्धतींप्रमाणे 'हलाल' किंवा 'कोशर' अन्न खात असतीलही, परंतु त्यांच्या अन्नाला 'हलाल' किंवा 'कोशर' म्हटले म्हणून सामान्य बिगरमुसलमान बिगरयहुदी मराठी व्यक्तीच्या आहाराचा उल्लेख सामान्य परिस्थितीत महाराष्ट्रात आणि मराठीत 'बिगरहलाल' अथवा 'बिगरकोशर' असा होत नाही, आणि होण्याचे कारणही नसते. लक्ष्मी रोडवरचे 'जनसेवा दुग्धमंदिर' अथवा फर्ग्युसनरोडवरचे 'वैशाली' ही शाकाहारी उपाहारगृहे आहेत असे मराठीत कोणीही सांगेल, ती 'बिगरकोशर' अथवा 'बिगरहलाल' आहेत असा उल्लेख तथ्यास धरून ठरला, तरी मराठीत आजतागायत झालेला ऐकलेला नाही. )
** उलटपक्षी, अशा वातावरणात न वाढलेल्या परंतु जेथे शाकाहाराला विशेष महत्त्व दिले जाते अशा प्रदेशात (उदा. भारतीय वातावरणात) वाढलेल्या मांसाहारी मनुष्याचेही विनाकारण तुलनेच्या अनिष्ट*** प्रथेमुळे ('हात् लेको! कढी वरणभात नि बुळबुळीत भेंडी खा तुम्ही! आमच्या जेवणाची सर तुम्हाला कशी येणार? तेथे पाहिजे...' किंवा, लेखकाने दाखला दिल्याप्रमाणे, मटण खाताना 'बामणांनी मटण महाग करून ठेवलेले आहे' या बाबीची आठवण, वगैरे वगैरे.) मांस ग्रहण केल्यावर (किंवा करताना) लक्ष वेधले जाणे हेही एक वेळ कल्पना करता येण्यासारखे आहे.
(***आणि दुतर्फा.)
परंतु ज्या समाजांत शाकाहाराला तितकेसे महत्त्व नाही (मग भले तेथे काही तुरळक लोक या ना त्या कारणामुळे शाकाहारी - अगदी वेगन****सुद्धा - असोत) अशा समाजांतदेखील मांस ग्रहण केल्याने विशेष लक्ष वेधले जाते, हे सयुक्तिक वाटत नाही, अथवा तसा अनुभवही नाही. (उलटपक्षी, अशा ठिकाणी काही भारतीय शाकाहारी - विशेषतः जुन्या पिढीतले वगैरे - भेट द्यावयास गेले, आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्यासमोर वाढून आलेल्या शाकाहारी वाटणाऱ्या अन्नास मांसांशाचा दूरान्वयानेदेखील स्पर्श झाला अशी शंकादेखील आली, तरी थयथयाट करून लक्ष वेधून घेतात, असाही स्वल्पानुभव आहे. म्याक्डोनल्डमंडळींनी आपल्या फ्रेंच फ्राइज़ या 'शुद्ध शाकाहारी' असतात, असा दावा कोठेही केलेला नाही. परंतु, त्या खाऊन नंतर मग पुढे कधीतरी त्यांच्या घडणीत कोठेतरी अत्यल्प अतिसूक्ष्म अंशात गायीच्या चरबीचा अंश असतो, असे ज्ञान झाल्यावर, 'आमचा धर्म भ्रष्ट झाला, म्याकडॉनल्डांनी आपल्या फ्रेंच फ्राइज़ या शाकाहारी नसतात हे कधीही सांगितले नाही' अशी आरडाओरड नि म्याकडॉनल्डांविरुद्ध कोर्टात दावे वगैरे ठोकण्याचे प्रकार अमेरिकेत एका हिंदू शाकाहारी सद्गृहस्थांनी करून झालेले आहेत. हा - विशेषतः कोर्टात दावे ठोकण्याचा प्रकार हा - लक्ष वेधण्याचा प्रकार नसल्यास आणखी कशाचा प्रकार आहे, हे कळत नाही. अर्थात, असा लक्षवेधीपणा ही भारतीय हिंदू शाकाहारींचीच खासियत आहे, असा दावा नाही. फक्त, शाकाहाराचा नि लक्ष वेधण्या-न वेधण्याचा काहीही संबंध नाही, एवढेच मांडायचे आहे. किंवा कदाचित, शाकाहारी मंडळींस चुकून अन्नातून शरीरात 'नॉनवेज' गेले असता त्यांचे लक्ष वेधले जात असेलही; इतरांचे तसे लक्ष वेधले जाण्याचे सामान्यतः काही कारण दिसत नाही. ) भारतात जेवढे शाकाहार आणि मांसाहार दोन्हींचेही स्तोम माजवले जाते, तितक्या प्रमाणात (उदाहरणादाखल) अमेरिकेत माजवले गेल्याचे आढळलेले नाही, सबब अशा वातावरणात मांस ग्रहण केल्याने लक्ष वेधले जाते, हा दावा पटण्यासारखा नाही.
(**** वेगन = जे केवळ मांसच नाही, तर कोणताही प्राणिजन्य पदार्थ - अंडी अथवा दूध किंवा दुधाचे पदार्थसुद्धा - खाणे वर्ज्य मानतात, असे लोक.)
थोडक्यात, समोर जे काही वाढून आलेले आहे, ते 'मांसाहाऱ्यांचे "नॉनव्हेज" आहे, कोणीतरी कधीतरी कोणालातरी वर्ज्य म्हणून सांगितलेले आहे, "तामसी" म्हणून ठरवलेले आहे' किंवा 'त्या कढी-वरणभात-बुळबुळीत-भेंडीवाल्यांचे शाकाहारी आहे, "घासपूस" आहे, "सात्त्विक" म्हणून चढवून ठेवलेले आहे' असला कोणताही विचार न करता मुकाट गिळले, तर अजिबात लक्ष वेधले जात नाही. उलटपक्षी, समोर वाढून आलेले जर आपल्या अतिशय आवडीचे असेल (मग भले तो मटणाचा रस्सा असो, की मत्स्याहारी-लोक-बोंबलाचे-जे-काही-बनवत-असतील-ते-पण-मला-त्यातले-काही-कळत-नाही-म्हणून-त्याचे-नेमके-नाव-घेऊ-शकत-नाही-तशापैकी काही असो, की ष्टेक असो, की बर्गर असो, की पिझ्झा असो, की बग़ारे बैंगन असो, की मटारची उसळ असो, की केळ्याची शिकरण असो) किंवा अतिशय नावडीचे असेल, तर लक्ष हे वेधले जाणारच. आणि का जाऊ नये?
बाकी, कंपॅटिबिलिटी वगैरेचे म्हणाल, तर बंकम आहे. 'अमूकतमूक हे आपल्याला कंपॅटिबल नाही' असे मनात बिंबवले असले, की कंपॅटिबल वाटेनासे होते, मग त्याचा त्रास वाटू लागतो. असले काही मनावर बिंबवलेले नसले, तर काहीही इन्कंपॅटिबिलिटीचा वगैरे त्रास होत नाही. थोडक्यात, हे सगळे मनाचे नि संस्काराचे खेळ आहेत*****. अन्यथा, जगात बहुसंख्य लोक हे मिश्राहारी आहेत, ते काय कंपॅटिबिलिटी असल्याखेरीज?
(***** पूर्वी इंग्रजांमध्ये 'हे हिंदुस्थानी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे ते दुबळे असतात. म्हणून तर इंग्रज त्यांच्यावर राज्य करू शकतो.' अशी समजूत प्रचलित होती. गांधींनी त्यांच्या 'सत्याच्या प्रयोगांत' याचा उल्लेख केलेला आहे. तशीच, पाकिस्तानी सैन्यात म्हणे एके काळी 'एक पाकिस्तानी मुसलमान सैनिक हा दहा हिंदू सैनिकांच्या तुल्यबळ आहे' अशी समजूत असे. अर्थात, यात काहीही तथ्य नाही. पण असे समज हे सहसा प्रथेने असतात, पारंपरिक असतात, समाजातील संस्कारांचा भाग असतात. '"आपण", "आपल्या" पद्धती बरोबर, "ते", "त्यांच्या" पद्धती चूक' असे मानण्याची प्रत्येकच समाजाची स्ववैधीकरणाची - सेल्फवॅलिडेशनची - मानसिक गरज असते, त्यातून निर्माण होतात. पण म्हणजे ते बरोबर असतात, असे नव्हे.
'शाकाहार हाच मनुष्याकरिता अधिक कंपॅटिबल' वगैरे थियऱ्या या अशाच मानसिक गरजांचा प्रकार आहे. आणि जेथे शाकाहाराचे संस्कार आहेत, अशाच समाजांत प्रकर्षाने प्रसृत केला जाणारा प्रकार आहे. अन्यथा, बहुतांश जग हे मांस वर्ज्य करून केवळ शाकाहार स्वीकारण्याच्या कोणत्याही घाईत नाही. वस्तुतः, अन्न हे अन्न असते. जे आपण खाऊ शकतो आणि जे आपल्याला खावेसे वाटते, ते सगळे कंपॅटिबल. त्यापुढे राहतो, तो केवळ आवडीनिवडींचा प्रश्न. हा प्रश्न पूर्णपणे वैयक्तिक आहे. ज्याला जे आवडते, ते त्याने खावे. 'हेच खाणे योग्य/कंपॅटिबल, नि ते अयोग्य/इन्कंपॅटिबल' असा वैश्विक नियम असू शकत नाही. प्रश्न मिटला.)
थोडक्यात, ज्याला शाकाहारी खावे असे वाटते, त्याने शाकाहारी खावे. ज्याला मांसाहारी खावे असे वाटते, त्याने मांसाहारी खावे. ज्याला दोन्ही खावे असे वाटते, त्याने दोन्ही खावे. ज्याला अमूक एखादे खाऊ नये असे वाटते, त्याने तमूक ते खाऊ नये. अमूक का खावे नि तमूक का खाऊ नये, याचा विचार करू नये. वाटले तर खावे, नाही वाटले तर खाऊ नये. इतके सोपे आहे हे.
व्यक्तिशः माझ्यापुरते बोलायचे तर, दोन्ही खाणे शक्य असताना (आणि उपलब्ध असताना) केवळ एकच खाण्याची मर्यादा स्वतःवर काय म्हणून लादून घ्यायची, असा विचार मी करतो. अर्थात, हा पूर्णपणे माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. इतरांचे दृष्टिकोन अर्थातच याहून वेगळे असू शकतात.