पण नंतर मांसाहाराचे एक दोन 'प्रयोग' करताना लक्षात आले की ह्या उत्तरात
तसा काही अर्थ नाही. मांसाहारी पदार्थांत दिसणारे प्राण्यांच्या शरीरातले
आकार पाहून ते खाणे नकोसे वाटते आणि कुणी ते आकार उकार काढून दिले(आणि समजा
डोळे मिटून खाल्ले) तरी चव बीव विशेष आवडत नाही
हा अर्थातच वैयक्तिक आवडीनिवडीचा आणि कंडिशनिंगचा प्रश्न आहे.
म्हणजे, चव आवडत नाही हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न. शरीरातले आकार पाहून खाणे नकोसे वाटणे हा कंडिशनिंगचा. एवढेच कशाला, समोर एखादा मीडियम रेअर/किंचित रेअरकडे झुकणारा ष्टेक खात आहे आणि त्या अर्धवट शिजलेल्या मांसखंडातून किंचित रक्तांश अजूनही स्रवत आहे, या दृश्याचीही अनेकांना शिसारी येऊ शकते. (त्यात गैर काहीही नाही.) मात्र ज्याअर्थी खाणारा मजेत आणि आवडीने खात आहे, त्या अर्थी त्याला शिसारी येत नाही, हे उघड आहे. अर्थातच प्रत्येकाचे कंडिशनिंग वेगळे असू शकते.
फार कशाला, एखादा पट्टीचा मत्स्याहारी आहे, याचा अर्थ त्याला 'सुशी' (कच्च्या माशांचा जपानी प्रकार) खाण्याची कल्पना झेपेलच, असेही नाही. वस्तुतः 'सुशी'कडे बघितले, तर त्यात शिसारी येण्यासारखे काहीही नसते. किंबहुना (हा प्रकार) आकर्षक दिसतो, असे मी तरी म्हणेन. आणि ज्याने हा प्रकार खाल्लेला आहे, तो हा प्रकार अतिशय स्वादिष्ट असतो याची ग्वाही देईल. परंतु 'तो मासा कच्चा आहे' या कल्पनेनेच एखाद्याला तो खावासा न वाटणे शक्य आहे. ('पूर्वरंग' मध्ये पु.लं.नी, आपण पट्टीचे मत्स्याहारी असलो, तरी आपल्या गेल्या अनेक पिढ्यांत कोणीही कच्चा मासा खाल्लेला नसल्याने जपानमधील विमानप्रवासात केवळ 'सुशी' खायला मिळाल्याने हाल झाल्याचा दाखला दिलेला आहे.)
अळंबी (मश्रूम्स) हा प्रकार खरे तर शाकाहारी. परंतु हे माहीत असूनही पुढ्यातल्या मर्यादित शाकाहारी पर्यायांत अळंबीचा पर्याय आलेला असताना त्यास ('ट्राय' करण्यासाठीसुद्धा) ठाम नकार देणारे शाकाहारी असू शकतात, हेही अनुभवलेले आहे. ('सॅलड' वगैरे तर पुढची गोष्ट झाली. हा प्रकार खाण्यायोग्य असतो हेही मानायला तयार नसलेली मंडळी पाहिलेली आहेत. 'चविष्ट लागू शकतो' ही फार पुढची गोष्ट.)
भारतीय उपाहारगृहात आंब्याची लस्सी हा प्रकार 'दह्यापासून बनलेला' या कारणास्तव 'ट्राय' करण्यास नकार देणारा आंग्लोद्भव गौरवर्णीय अमेरिकन मनुष्यदेखील मी पाहिलेला आहे.
प्रत्येकाचे कंडिशनिंग अर्थातच वेगवेगळे असते, आणि कोणास कोणत्या कारणामुळे आणि काय खाणे नकोसे वाटावे याचाही काही वैश्विक नियम नसावा. (मलाही काही खाद्यपदार्थांची काहीही कारण नसताना शिसारी येऊ शकते. असे पदार्थ माझ्या आजूबाजूच्या इतरांना अतिशय आवडण्यासारखेही असू शकतात. आता वास्तविक टरबूज, पपई, कलिंगड यांसारखी फळे किंवा दुधातली साय यांच्यात शिसारी येण्यासारखे काय आहे? पण येते. कंडिशनिंग! दुसरे काय?)
थोडक्यात, ज्याला जे झेपते, तो ते खातो, आणि नाही झेपत, ते नाही खात. हे नैसर्गिक आहे. मुद्दा एवढाच आहे, की हे ज्यानेत्याने आपापले ठरवावे. कोणी काय खावे आणि 'माणसास काय झेपते/कंपॅटिबल आहे' वगैरे 'वैश्विक नियम' कोणी आणि काय म्हणून बनवावेत?
जी काय चव/स्वाद असतो तो मसाल्याचा असतो (असे मला वाटते)
'जी काही चव/स्वाद असतो तो मसाल्याचा असतो' हे कदाचित (विशेषतः) भारतीय पद्धतीच्या अतिमसालित रस्सायुक्त मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत काही अंशी खरे असेलही, परंतु सरसकट खरे नाही, एवढेच नमूद करू इच्छितो.
बाकी अर्थातच आधी म्हटल्याप्रमाणे सवय, आवडनिवड आणि कंडिशनिंगचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या आहाराची निवड ठरवतोच. त्याला 'वन-साइझ-फिटस-ऑल'चा साचा लावण्याचा कोणी प्रयत्न का करावा, या बाबीकरिता एकच वैश्विक उत्तर का असावे, एकच वैश्विक सिद्धांत कशाबद्दल मांडावा, एवढेच म्हणण्याचा प्रयत्न आहे.