इंग्रजांनी भारताला शिकवले, सुसंस्कृत केले, प्रगत केले वगरे मानणारा एक मोठा वर्ग हिंदुस्थानात आहे. याला कारणे दोन. पहिले म्हणजे इंग्रज धार्जिणा इतिहास. दुसरे म्हणजे मानसिक जडत्व. प्रथमदर्शनी दृश्यावरुन घटनेचा तर्क बांधायचा, त्यालाच अविचल व अटळ सत्य मानायचे व कोणत्याही परिस्थितीत समांतर पातळीवर निःपक्षपाती विचार करून इतर बाजू समजून घेण्यास मनोमन नकार देउन आपल्याच गृहितकावर अडून राहणे म्हणजे मानसिक जडत्व.

इंग्रज जिथे गेले नाहीत त्या रशिया व जर्मनिचे काय? फ़्रान्स, चीन, जपानचे काय? तिथल्या सुधारणा कोणी केल्या? त्या जनतेला शिक्षण कोणी दिले? जुलुमी निर्बंध असूनही जर्मनी औद्योगिक क्षेत्रात प्रगत झालाच ना? महायुद्धात उध्वस्त झालेल्या जपान ने काही दशकांतच इतकी प्रगति केली कि जपानमधल्या मोटारगाड्यांनी युरोपच्या तोंडाला फ़ेस आणला.

आता इंग्रजांच्या भारतातिल अमलाविषयी. इथे त्यांनी ज्या काही सुधारणा केल्या त्या बहुत्वेकरून स्वतःचे जीवन सुलभ करण्यासाठी. बाइसाहेब गड्याला मोटार हाकाला शिकवतात त्या नोकराचा उद्धार व्हावा, त्याला नव्या यंत्राची ओळख व्हावी, त्याला उपजिविकेचे नवे साधन मिळावे म्हणून नव्हे तर त्यांची स्वतःची आरामात जाण्या-येण्याची सोय व्हावी म्हणून.  तदवत इंग्रजांनी आपले राज्य सुलभतेने हाकता यावे, बाबू लोक इथेच शिकून तयार व्हावेत, शिक्षण घेताना बाबूंना मनोमन वाटावे कि राजा-राणी हेच मायबाप म्हणून. एखादी कंपनी टेक ओव्हर केल्यावरही तिथल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना चुचकारले जाते. ते काही त्यांच्या कामाची कदर वा त्यांच्या कुटुंबाची किव म्हणून नव्हे तर त्यांच्या ज्ञानाचा फ़ायदा करुन आपल्याला वर येता यावे व त्याच वेळी त्यांच्या मनात उपकृत झाल्याची भावनाही निर्माण व्हावी व त्यांनी नव्या व्यवस्थापना विरुद्ध जाउ नये म्हणून.

शिकलेल्या लोकांना त्यांच्या समाजातील तृटी दाखवून देउन इंग्रज किती प्रगत व महान आहेत हे दाखवून देणे हा देखिल एक उद्देश. संस्थानिकांच्या मुलांना शिकायला तिकडे नेले जत असे ते त्यांना विलासी भोगाचे गुलाम बनवून त्यांची कर्तव्य बुद्धी खतम करण्यासाठी. शिकुन मामलेदार वा फ़ौजदार झालेल्यांना समाजासाठी काही करायची प्रेरणा या ईंग्रजांनी  दिली नाही उलट समाजाला भरडण्यासाठी त्यांना वापरले.

इंग्रजांनी सुधारणा केल्या. पण कुठे? त्यांना हव्या होत्या तिथेच. कोकणात का नाही केल्या? उत्तर पूर्वेत का नाही केल्या? खेड्यापाड्यांत का नाही केल्या? मड्डम व साहेब मजकूरांस उन्हाळा सहन होत नसल्याने 'हिल स्टेशन्स' तयार झाली.  आदीवासींसाठी कसली सोय मात्र झाली नाही कारण साहेबाला त्याचा काहीच उपयोग नव्हता.