अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन खूप यशस्वी झाले. हजारो लाखो लोक त्यात सामील झाले. कोणी मोर्चे-मिरवणुका काढून तर कुणी मेणबत्त्या घेऊन तर आणखी कुणी काळ्या फिती लावून. हे सर्व सामान्य लोक होते, तुमच्या आमच्या सारखे. अण्णांच्या रूपाने त्यांना आवाज मिळाला.
वगैरे वगैरे.
मान्य.
काल आम्ही सामान्य माणसे(मी व माझी मुले) एका सामान्य माणसाच्या रिक्शात बसलो बळजबरीने. कारण आम्हांला जिथे जायचे होते तिथे त्याला यायचे नव्हते. बरे, त्या गरीब बिचाऱ्या सामान्य रिक्शावाल्याच्या गाडीचे मीटर त्याच्या रिक्शाच्यावेगाइतकेच भन्नाट धावत होते.मग मी त्याला म्हटलेच, ते अण्णा हजारे तिकडे उपोषण करतात आणि तुम्ही?
रिक्शातून उतरलो आणि रस्ता ओलांडत होतो तोच एक दुचाकीवाला झपकन समोर आला. तो एकदिक मार्ग होता. आम्हांला पाहून त्याने ब्रेक लावला खरा, पण तोपर्यंत माझ्या हातातली पिशवी आणि धाकटा मुलगा दोन्ही धराशायी झाले होते. आम्ही सावरेपर्यंत दुचाकीस्वार गेलाही निघून. मला अण्णा हजाऱ्यांची आठवण आलीच आली.
पुढे सफरचंदे दिसली चांगलीशी. घ्यायला गेलो तर एक किलोमध्ये फक्त पाच मध्यम आकाराची सफरचंदे, ज्यांचे वजन पाऊण किलोहून अधिक असणे शक्यच नव्हते. त्या फळविक्याने बहुधा अण्णा हजारेंचे नाव ऐकलेले नसावे असा विचार करून अण्णांचा विचारही मनात न आणता नुसतेच चरफडून घेतले.
त्यानंतर पेवर ब्लॉक्स लावलेल्या आणि रस्त्यापेक्षा उंच असलेल्या पदपथावरून आम्ही सुरक्षित रीत्या चालू लागलो तर मागून आणि पुढून एकाचवेळी दोन सायकलस्वार आम्हांला सामोरे आणि पाठमोरे आले. त्यांना वाट करून देण्यासाठी आम्हांलाच पदपथावरून खाली उतरावे लागले.या वेळी मात्र त्यातला एक स्वार थँक यू किंवा सॉरी असे काहीसे पुटपुटला. जय अण्णा हजारे!
भाष्य : सामान्य माणसाची अडवणूक किंवा नाडणूक सामान्य माणसाकडूनच होते. हीच सामान्य माणसे आंदोलनात, मिरवणुकीत सामील होतात, 'भ्रष्टाचार हाय हाय', 'इन्कलाब ज़िंदाबाद' म्हणून घोषणाबाजी करतात, तेव्हा ते एक ढोंग ठरते. भ्रष्टाचार इतरत्र कुठेही नाही. तो आपल्यामध्येच आहे. आपल्यातल्या प्रत्येकावर नजर ठेवायची तर प्रत्येक माणसामागे एक गुप्तहेर अथवा पुलीस लागेल. प्रत्येकाने आपापली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवली तर लोकपालाची काहीच आवश्यकता नाही आणि तशी न ठेवली तर लोकपाल येऊनही काही उपयोग नाही.
काही लोक म्हणतात की वरच्यांना दट्ट्या बसला की खालचे लोक सुतासारखे सरळ येतील. पण हा भ्रम आहे. सद्वर्तन हे धाकाने होत नसते. किंवा झाले तरी ते टिकाऊ नसते. ते स्वयंशिस्तीनेच व्हायला हवे. शिवाय आपल्याकडे लोकशाही आहे. हे जे तथाकथित 'वरचे लोक' आहेत, ते आपल्यातलेच आहेत. जे आडात आहे तेच पोहोऱ्यात आहे.
खरी गोष्ट अशी आहे की आपण अजूनही सामाजिकदृष्ट्या अप्रगत अवस्थेत आहोत. समाजात सुव्यवस्था नांदण्यासाठी काही थोडी स्वयंशिस्त, काही नियम, काही बंधने पाळणे आवश्यक असते, याची जाण आम्हांस नाही.आम्ही मोकाट, स्वैर वागण्यास सोकावलेले आहोत, किंबहुना तोच आमचा मूळ स्वभाव आहे. शिस्तीची बंधने आम्हांला रुचत नाहीत आणि संधी मिळेल तेव्हा ती झुगारून देण्यास, त्यविरुद्ध बंड करण्यास आम्ही टपलेले असतो.
भ्रष्टाचाराचा उगम म्हणून अण्णा हजारेंना अनुसरून आपण तिसऱ्याच दिशेकडे तर्जनी उंचावतो आहोत. पण इतर चारही बोटांचा रोख आपल्याकडेच आहे हे आपण जाणून घेत नाही. ती जाण जेव्हा येईल तेव्हा अण्णा हजारेंविनाही भ्रष्टाचारनिर्मूलन होईल.