भ्रष्ट आचार हा माणसात वसलेल्या काम, क्रोध आदी षडरिपूंचा मर्यादे बाहेर उद्रेक झाला की घडत असतो. त्यामुळे त्याचे उच्चाटन करण्याचा कार्यक्रम म्हणजे मोठे महायुद्ध होय. हे युद्ध अनादी कालापासून चालू आहे. इतके संतसज्जन या महायुद्धात धारातिर्थी पडले तरी त्यातील अंतीम जय जवळपास देखिल दिसत नाही.
राजकीय नेते, शासनातील सर्व स्तरातील अधिकारी आणि व्यावसायिक यांच्या 'एकमेका सहाय्य करू' च्या एकजुटीमुळे त्यांचे षडरिपू मोकाट सुटून कररूपाने लोकांकडून जमा केलेल्या पैशाची खुलेआम लूट करीत आहेत. लूट पचवीत आहेत आणि लुटीच्या पैशातून अधिकाधिक शक्तिमान होताहेत. हे पाहून सगळा सगळा समाजच भ्रष्ट व्हायला लागला आहे. अण्णांच्या जनलोकपाल बिलाचे आंदोलन सार्वजनिक पैशाला पडलेले हे मोठे खिंडार प्रथम बुजवावे या दृष्टीने चालले आहे असे मला वाटते. ते जर बुजले तर बराच पैसा देशाच्या भल्यासाठी उपयोगी पडेल. त्याशिवायही अनेक बदल घडवून आणण्याचा दीर्घ मुदतीचा कार्यक्रमही त्यांच्यापाशी आहे. लतापुष्पा यांनी दाखवून दिलेला भ्रष्टाचारावरही या आंदोलनाचा थोडा परिणाम होईलच. पण तो भ्रष्टाचार नष्ट व्हायला लोक खरोखरच संतांच्या मार्गावरून (नुसत्या वारी मार्गावरून नव्हे ) जायला लागले तरच कमी होईल. पण म्हणून अण्णांच्या आंदोलनाबद्दल 'याने काय होणार' असा निराशावादी सूर कशाला आळवायचा?