आपल्या मताचा आदर राखूनही असे सांगावेसे वाटते की हा रामबाण उपाय नव्हे. किंबहुना हा उपायच नव्हे.

याच्याशी सहमत आहे, पण...

बरीचशी स्वयंशिस्त ही हवीच.

हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर स्वयंशिस्तीचा - स्वतःबद्दलच्या आदरातून कोणीही न सांगता स्वतःच ठरवून स्वतःलाच लावून घेतलेल्या शिस्तीचा - लक्षणीय अभाव हे आपल्या समाजाचे सर्वात मोठे दुखणे आहे हे मानण्यास प्रत्यवाय नसावा. यात तुम्ही-आम्ही-आपण-सर्वच थोड्याफार फरकाने आलोच. (अपवाद विरळा. )

(कदाचित स्वतःबद्दलचा आदर - ज्याला मराठीत सेल्फ-रिस्पेक्ट म्हणतात, तो - ही आपल्या समाजात बहुतांशी केवळ सांगीवांगीने ऐकून माहीत असण्याइतकी दुर्मिळ चीज असावी काय? की बाबा, 'अशा नावाची काहीतरी गोष्ट असते', असे कोठेतरी कधीतरी उडत‌उडत ऐकल्यासारखे वाटते, वगैरे, या रकान्यात दाखल करण्याजोगी?

माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांनी एकदा 'स्त्रियांकरिता समान हक्क ही एक पाश्चात्य संकल्पना आहे' अशा आशयाचे एक जाहीर विधान केले होते, त्यातून प्रचंड गदारोळ झाल्याचे आठवते. या विधानातील अत्यंत आक्षेपार्ह असा जो विध्यर्थी रोख आहे - पक्षी: 'ती पाश्चात्य संकल्पना(च) असावी; सबब, भारतीय परिस्थितीत ती संकल्पना लागू ठरू नये' - त्याकडे, 'प्रस्तुत वक्त्याच्या वक्तृत्वातून अशा हास्यास्पद विधानांहून वेगळी अशी आणखी काय अपेक्षा करावी' या भावनेने दुर्लक्ष केल्यास, समकालीन भारतीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य म्हणून हे विधान खपून जावे, नाही का? म्हणजे, 'स्त्रियांकरिता समान हक्क ही कल्पनाच आमच्या समाजात नाही, आमची नाही. त्या पाश्चात्यांचे ऐकून काही जण अशी काहीतरी पोपटपंची अधूनमधून करत असतात खरे, पण ते काही खरे नाही. ही कल्पना मुळात इथली नाही, इथल्या समाजमनात रुजलेली नाही, हेच खरे' अशा अर्थी.

त्याच धर्तीवर, 'स्वतःबद्दलचा आदर उर्फ (मराठीत) सेल्फ-रिस्पेक्ट ही एक पाश्चात्य - किंवा किमानपक्षी परकीय (एलियन) - कल्पना आहे (थोडक्यात, 'सेल्फ-रिस्पेक्ट' कशाशी खातात ते आम्हांस ठाऊक नाही')' असे विधान कोणी केल्यास ते सयुक्तिक ठरावे काय?)

पण...

स्वतःस शिस्त ही प्रयत्नांनी एक वेळ लावता येईल. हे महाकठीण आहे, पण अशक्य नसावे. पण...

आपण स्वतःस शिस्त लावून घेतली, तरी उर्वरित समाजावर तसेच करण्याचे कोणतेही बंधन राहत नाही. आपण भलेही स्वतःस शिस्त लावून घेऊ, पण उर्वरित समाजाने स्वतःबद्दल तसेच न करण्याचे ठरवले, तर मग काय? (असाच अनुभव येईल असे वाटते. काहीसे 'Laugh, and the world laughs with you. Cry, and you have to blow your own nose'*च्या धर्तीवर.)

अर्थात, स्वतःस शिस्त लावून घेऊ नये असे म्हणण्याचा उद्देश नाही. स्वतःबद्दलच्या आदराखातर ते करावेच. फक्त, हाही उपाय होऊ शकत नाही; यातून स्वतःबद्दलचा आदर अबाधित राहण्याव्यतिरिक्त काहीही साध्य होऊ शकत नाही, एवढेच मांडायचे होते.

* (श्रेयअव्हेर: या विधानाच्या या आवृत्तीचे श्रेय इतरत्र. )