दुर्भिक्ष्य असतानाच घोटाळे निर्माण होतात हे काही अंशीच खरे आहे. 'आदर्श' इमारतीत ज्यांनी सदनिका नोंदवल्या, त्यांच्याकडे त्या आधी सदनिका नव्हत्या की काय? उलट त्यांच्याकडे एक सोडून दोनतीन सदनिका होत्या. पण त्यांना कुलाब्यासारख्या मोक्याच्या आणि प्रतिष्ठेच्या जागेत सदनिका हव्या होत्या. हा मोकाट लोभ नव्हे काय? साठेबाज धान्याचा साठा करून धान्याची कृत्रिम टंचाई निर्माण करतात ती अधिक धन कमवण्याच्या लोभापायी. धान्य मुबलक झाले तरी टंचाई निर्माण होते.
अगदी वैयक्तिक उदाहरण (खरे तर देऊ नये पण) द्यावेसे वाटते. आम्ही राहातो तिथे एकाच आवारात दोन इमारती आहेत. दोनही इमारतींना पाणीपुरवठा एकाच साठवण टाकीतून होतो.(जी पुरेशी मोठी आहे.) त्या टाकीतून दोन वेगवेगळ्या जलवाहिन्या दोन इमारतींसाठी आहेत. पाणीपुरवठा नियंत्रित करण्यासाठी एक तरफ(लीवर) आहे.ती जमिनीसमांतर ठेवली तर दोन्हीकडे पाण्याचा प्रवाह समान राहातो. ती खाली-वर ओढून जलवाहिन्यांतला पाण्याचा प्रवाह कमीजास्त करता अथवा थांबवता येतो. एका इमारतीतले लोक ही लीवर अशा तऱ्हेने ओढून ठेवतात की पाणी त्यांच्याच इमारतीत जास्त काळ वाहावे. या साठी ते लोक पंप सुरू करणाऱ्या नोकरावर दबाव आणतात. आता इथे या माणसावर सतत लक्ष ठेवणे म्हणजे आणखी एक माणूस नेमणे आले. आणि हा नवा माणूस तरी भ्रष्ट वागणार नाही, प्रलोभनाला अथवा धाकाला बळी पडणार नाही कशावरून? आणि हे लोक या नवनव्या नोकरांवर दबाव टाकीत राहाणार नाहीत कशावरून? (आमच्या येथे नैसर्गिक पाणीटंचाई नाही, पण कृत्रिम आहे.)
आणखी एक उदाहरण सतत दृष्टीस पडणारे. विमानप्रवास करताना प्रत्येकाची आसनव्यवस्था सुनिश्चित असते. विमानात प्रवेश करताना-विशेषतः मोठ्या, अतिमोठ्या विमानात- आसनक्रमांक पुकारले जातात आणि त्यानुसार लोकांनी विमानदरवाज्यापाशी यावे अशी अपेक्षा असते. पण भारतीय(च) लोक दरवाज्यापाशी गर्दी करून एकच कालवा करतात. जर प्रत्येकाची जागा ठरलेली आहे आणि त्याला ती मिळणारच आहे, तर झुंबड कशासाठी?
असो. अनेक उदाहरणे देता येतील. स्वयंशिस्तीला अधिक महत्त्व असावे असे वैयक्तिकरीत्या वाटते आणि तिचा अभावही अधिक जाणवतो.