प्रथम आपण कुठे बदल घडवतोयं ते लक्षात घ्या, आपण बदल मनोगतवरची ही पोस्ट वाचणाऱ्यांच्या आयुष्यात घडवण्याचा प्रयत्न करतोयं, भ्रष्टाचाऱ्यांना याचं काही एक सोयरसुतक नाहीये हा मुद्दा लक्षात येतोय का ते पाहा.
जे वाचतायत त्यांच्यात स्वयंशिस्त आहेच नाहीतर त्यांनी भ्रष्टाचारा विरूद्ध ब्र काढला नसता त्यामुळे स्वयंशिस्तीचा मुद्दा इथे पूर्णपणे निरूपयोगी आहे. जे वाचतायंत ते प्रामाणिकपणे जगले तर त्यांचा प्रामाणिकपणाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीला मिळण्याची शक्यता आहे (खात्री नाही पण शक्यता निश्चीत आहे) या उलट भ्रष्टाचाऱ्यांची पुढची पिढी प्रामाणिक होईल, तिला स्वयंशिस्त लागेल हा कल्पनाविलास आहे किंवा वेडी आशा आहे.
म्हणजे मनोगतवर निरर्थक चर्चा करायला, शब्दच्छल करायला, कल्पनाविस्तार करायला, एकमेकाच्या प्रतिसादातले बारिकसारीक मुद्दे घेऊन उहापोह करायला ठीक आहे पण वास्तविक जीवनात त्याचा काही एक उपयोग नाही, त्यानी कुणाच्याच आयुष्यात काहीही बदल घडणार नाही आणि परिणामी देशाच्या भविष्यावर तर नाहीच नाही, नुसती घनघोर चर्चा होईल.
आता या परिस्थितीत आपण (म्हणजे वाचणारे, ज्यांना ऑलरेडी स्वयंशिस्त आहे) काय करू शकतो तर स्वतःचं कुटुंब मर्यादित ठेवून निर्माण झालेल्या सुविधेत प्रमाणिकपणे जगू शकतो, आणि फक्त एकच गोष्ट करू शकतो, ज्यांना थोडं फार समजण्याची शक्यता आहे त्यांना कुटुंब मर्यादित ठेवून निर्माण होणाऱ्या संपन्नतेत प्रामाणिकपणे जगण्याची शक्यता निर्माण करू शकतो.
कलमाडींकडे सुबत्ता होती की नाही, त्यांचा फॅमिली साईज काय आहे, त्यांना भ्रष्टाचाराची सवय का जडली, त्यांना स्वयंशिस्त लागली पाहिजे, आम्ही त्यासाठी उपोषण करू, लोकपाल आणू असा विचार करून तुम्ही किती कलमाडी दुरूस्त करणार कारण? घरावर मोर्चे नेऊन, गावात जथे फिरवून, मेणबत्या लावून, कलमाडींचं हृदय परिवर्तन होईल आणि ते एकदम सर्व सवयी सोडून पार अण्णांना फिके पाडतील अशी स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे? कलमाडी असंख्य आहेत आणि तुम्ही निर्माण केलेली व्यवस्था आणि नवे कायदे राबवणारे कलमाडीनां सामिल होणार नाहीत कशावरून? आज जे काही कायदे आहेत त्यामुळेच कलमाडी आत आहेत, या प्रकियेतून यापेक्षा फार काही मोठं घडणार नाही. तुम्ही त्याही पुढे जाऊन विचार करा इतक्या लाख कोटींचा घोटाळा आहे त्यातले पाच टक्के पैसे पण हाती लागणार नाहीत (आणि माझ्या या सांगण्याची खरंच दखल घ्या म्हणजे तुम्हाला परिस्थिती काय आहे ते कळेल) कारण पैसे ऑलरेडी उडवून झालेत, देशाबाहेर पोहोचलेत, आता नुसता पोस्टमार्टेम चाललायं. तुम्ही कल्पना करा बोफोर्स तपासावर झालेला खर्च त्या अफरातफरीपेक्षा जास्त झाला आणि हाती अक्षरशः काही लागलं नाही. त्यात तर डायरेक्ट राजीव गांधी, अमिताभ बच्चन आणि हिंदुजा अशी मात्तब्बर नांव होती ( अमिताभ राजिनामा देऊन मोकळा झाला) आणि खाशोगी मधला दुवा होता.
त्यापेक्षा आपण कुटुंब सिमित ठेवून सुबत्तेत राहू आणि कलमाडींसारखी मानसिकता निदान आपल्या घरात तरी तयार होणार नाही अशी शक्यता निर्माण करू आणि अशी अनेक कुटुंब जेव्हा तुमचं ऐकणाऱ्या आप्तस्वकियात (म्हणजे आगदी साधे लोकः तुमची कामवाली, तुमचा भाजीवाला, तुमचा न्हावी, परीट, तुमचे मित्र, जवळचे नातेवाईक) तयार होतील तेव्हा त्यांनी निर्माण केलेल्या प्रामाणिकतेमुळे देश प्रामाणिक होईल, कलमाडी निर्माण होण्याची शक्यता कमी होईल इतकंच मला सांगायचंय. आता मी इथे थांबतो!
संजय