हो, लढाई हा शब्द खूप वेळा आलाय खरा. किंबहुना रामायण आणि महाभारतातल्या दोनच प्रसंगाभोवती हा लेख फिरल्यामुळे त्याला थोडं रूपकांचं दारिद्र्य आलंय. तसा फार मोठा जीव नाहीच त्याचा, पण तरीही एकच शब्द पुन्हा आल्याने ते दारिद्र्य आणखी उघडं पडतं. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

'सुखासमाधानाच्या आयुष्यात तो सुस्तावतो' हे अगदी खरं आहे. कष्ट घेणं, एखाद्या थोड्याशा हाताबाहेर वाटणाऱ्या ध्येयामागे धावणं यामध्ये जो आनंद असतो तो आपण नंतर विसरून जातो. शरीराप्रमाणेच मन सुस्तावतं आणि मग कशानेतरी स्वतःला झपाटून घेण्याची, प्रेरित होण्याची प्रवृत्ती कमी होते. विशिष्ट वयानंतर शरीराचा 'मसल मास' कमी होतो तसंच. तो पूर्वीप्रमाणेच मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसे प्रयत्न करण्यासाठी हे आवाहन आहे.

कितीही पुढे गेलं तरी क्षितिजाची कडा सापडलेला कोणीच नसतो. जीएंच्या 'यात्रिक' या कथेमध्ये असा कोणीतरी पाहण्याची आस लागून राहिलेल्या डॉन कियोटेचं वर्णन आहे. (तसं म्हटलं तर जीएंच्या अनेक कथांमध्ये अंतिम सत्य कोणाच्याच हाती लागलेलं नसणं हे कथासूत्र आहे) पण मंझिलपेक्षा प्रवास महत्त्वाचा असू शकतो. सुखाने सुस्तावून मिळालेला आनंद कमावण्यासाठी हा प्रवासाचा आनंद आपण घालवून बसलो आहोत का? हा सौदा तोट्याचा आहे की फायद्याचा? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असतीलच. पण प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.