मी ज्यावेळी सत्याचा शोध घ्यायला सुरूवात केली तेव्हा ओशो त्या क्षेत्रातले दिग्गज होते. मला एक गोष्ट नक्की माहिती होती की जर हा माणूस सत्याप्रत पोहोचू शकतो तर आपण का नाही? त्यावेळी त्यांचे सर्व शिष्य एकाच भ्रमात होते की ओशो काही तरी करतील आणि आपल्याला साक्षात्कार होईल, माझं केवळ नशीब की मी आश्रमात गेलो तेव्हा ओशोंना जाऊन तीन वर्ष झाली होती, आय नेव्हर मेट हिम इन पर्सन.


मी हल्ली दोन तीन वर्षातनं एखादे वेळी निव्वळ मजा म्हणून आश्रमात जातो तर ते साधक अजूनही त्याच भ्रमात दिसतात!


तुम्हाला कुणीही पोहचवू शकत नाही, तुम्हालाच स्वतःप्रत यावं लागतं.

आपणच ठरवतो की आध्यात्म अवघड आहे आणि आपणच ठरवतो की मी अजून पोहोचलो नाही.

हा लेख लिहीण्याचं कारणच मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही 'आपण निराकार जाणीव आहोत' ही खूणगाठ रात्रंदिवस मनाशी बांधून जगा, मी शेवटी लिहीलेल्या तीन गोष्टी हृदयस्थ करा आणि उत्सवपूर्ण व्हा, प्रत्येक प्रसंगात रंगत आणा.

तुमची खूणगाठ आंतरिक ठेवा कुणाला सांगायला किंवा पटवून द्यायला जाऊ नका.

एक दिवस तुमच्या लक्षात येईल की जी खूणगाठ तुम्ही मनाशी बांधून जगत होता ती सत्य होती, तीच वास्तविकता होती आणि जी तुम्ही वास्तविकता म्हणून जगत होता, जे तुमचे आप्तस्वकीय आणि दुनिया तुम्हाला क्षणोक्षणी पटवून देत होती आणि जे तुम्ही स्वतःला मानलं होतं ते व्यक्तीमत्व भ्रम होता, तुमच्याच कल्पनेनी तुम्ही तयार केलेला पिंजरा होता.

संजय