मला गवसलं म्हणून सांगत नाही, अतिशय प्रामाणिकपणे आणि सगळ्यांना उपयोगी व्हावं म्हणून सांगतो, तुम्ही सर्व बुद्धी, वेळ आणि धनसंपदा स्वरूप शोधायला लावा, मेक इट योर फस्ट प्रायॉरिटी.
ओशोंनी म्हटलंय 'एक साधो, सब सधे; एक जाए, सब जाए'
स्वरूप गवसल्यानी तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलतो, तुम्हाला इतरांच्या विचारप्रणालीच, ध्येयांच, आग्रक्रमांच, त्यांनी ठरवलेल्या आयुष्याच्या दिशेचं नवल वाटायला लागतं. तुम्ही चंद्रावर जाण्याऐवजी चंद्रच तुमच्या रात्रीत उतरतो, युद्ध, राजकारण, हा पक्ष की तो, याला फाशी द्यावी की नाही, गुंतवणूक कुठे करावी, अमका ग्रेट की तमका यात वेळ घालवण्याऐवजी तुम्ही स्वतःच्याच आवाजात गायला लागता. नाही त्याची आस धरण्याऐवजी तुम्ही आहे ते उपभोगायला लागता, तुमची पत्नीच तुमची प्रिया होते.
स्वरूप गवसायला मागल्या जन्मीची पुण्याई, पुढच्या जन्मीचा वायदा, अमक्याची कृपादृष्टी, तमक्याचा अनुग्रह, वेळ येणं, मुहूर्त साधणं काही म्हणता काही लागत नाही, तुम्हाला लाभलेली बुद्धिमत्ता आणि मनाचा खुलेपणा की ज्यामुळे तुमच्या चुकीच्या धारणा निखळतील या दोन गोष्टी असल्या की झालं!
मला वाटतं हा आपल्यातला संवाद तुम्हाला दुर्मिळ संधी आहे, तुम्ही हवा तो प्रश्न विचारा आणि तुम्हाला स्वतःप्रत यायला जे जे अडचणीचं वाटतंय त्याचं निराकरण करा.
संजय