आपापल्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडणारेच अथक कष्ट करून नवनवीन शोध लावतात. यात स्टीव्ह जॉब्स पासून आपल्या शेतात नवे वाण काढणारा शेतकरी हे सगळेच येतात.  आजवर झालेली नवनिर्मिती अशीच झालेली आहे. या नवनिर्मितीला आता जगभर 'इंटेलेक्ट्युअल प्रॉपर्टी' या स्वरूपात कायदेशीर/ अधिकृत मान्यताही मिळते आहे.

पुढे या नवनिर्मितीनुसार काही प्रक्रिया निश्चीत केल्या जाऊन त्यानुसार उत्पादन होते. (कदाचित आपापल्या कंफर्ट झोनमध्ये राहूनही) साचेबद्ध पद्धतीने कष्ट करणारे कित्येक लोक या उत्पादनप्रक्रियेत आपापल्या परीने सहभागी होतात. या साखळीमध्ये येनकेनप्रकारेण क्रयशक्ती कमावलेला उपभोक्ताच काय तो शेवटी बसल्याजागी सुखी होतो. त्याने आज सगळीकडे बोकाळलेला ग्राहकवाद आणि चंगळवाद या दिशेने न जाता नवनिर्मीती करणार्याची सृजनशीलता आणि साचेबद्ध पद्धतीने उत्पादन करणार्याचेदेखील कष्ट दोन्हीबद्दल उपकृततेची भावना ठेवायला हवी.   

साचेबद्ध पद्धतीने कष्ट करणारे कित्येकजण अंगभूत क्षमता असूनही काहीना काही कारणाने 'सीमोल्लंघन' करत नाहीत. त्यांची खास गुणवत्ता ही निव्वळ एक शक्यता (पोटेन्शियल) राहून जाते, तिचे प्रत्यक्षीकरण (युटिलायझेशन) होत नाही. यात त्या व्यक्तीचा आणि समाजाचा असा दुहेरी तोटा होतो. 'सीमोल्लंघनाचे' हे तत्त्व हे ज्ञान (आंतरिक, अध्यात्म वगैरे) आणि विज्ञान (बाह्य, भौतिक जगतातील) दोन्हीला लागू आहे. उदा. भगवद्गीतेवरच्या आपल्या टीकेत सहाव्या अध्यायात ज्ञानेश कुंडलिनी योगाची भर घालतात. प. पू. पारनेरकर महाराज  आजचा युगधर्म लक्षात घेउन पूर्णवादासारख्या एका परिपूर्ण 'दर्शना'ची षडदर्शनात मोलाची भर घालतात. स्टीव्ह जॉब्ससारखा सृजनशील सॉफ्टवेअर आर्किटेक्ट  आयपॉड, आयपॅड सारखी 'ऍपल'ची उत्पादने गळेकापू स्पर्धेवर मात करत लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवतो. थोडीफार 'लढाई' (वैचारिक का असेना) आणि स्पर्धा यात अटळच असते.

एका सृजनशील लेखकाने साचेबद्धपणात अडकलेल्याना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करण्यासाठी केलेले हे 'सीमोल्लंघनाचे' आवाहन आवडले.