>मी जेंव्हा जेंव्हा प्रामाणिकपणे सरुपाचा विचार करतो (प्रामाणिकपणे म्हणण्याचा अर्थ जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न मला जाणवतो) तेंव्हा तेंव्हा मला व्यक्तीत्वाच्या एखाद्या पैलुचंच दमदार-ठळक असं दर्शन होतं, त्याक्षणी निराकार वगैरे गोष्टी अजीबात मनात येत नाही.

= प्रश्न केव्हा जाणवतो? तुम्ही कधी पाहिलंय ? ज्यावेळी आपण प्रसंगात सापडलेलो असतो तेव्हा, जेव्हा काही तरी मनाविरूद्ध, नकोसं वाटणारं घडतं तेव्हा, आणि असं का होतं? तर प्रसंगात तुम्ही फक्त व्यक्ती म्हणूनच सापडू शकता, निराकार जाणीव नेहमी प्रसंगा बाहेर आहे!

एकदा प्रसंगात सापडल्यावर आपल्याला व्यक्तीमत्वाच्याच पैलूचं दमदार आणि ठळक दर्शन होणार कारण प्रसंगातून बाहेर पडायचा एकच मार्ग आपल्याला माहितीये: पूर्वानुभव! आपण अनाहूतपणे स्मृतीत ओढले जातो आणि व्यक्तीमत्वच सक्रीय होतं कारण व्यक्ती ही आपण गतस्मृतींच्या आधारानी स्वत:विषयी केलेली कल्पना आहे.

तुमच्या लक्षात येतंय? असा कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही स्वत:प्रत येऊ शकणार नाही कारण निराकार जाणीव ही प्रसंगात सापडण्यापूर्वीची स्थिती आहे आणि आपण प्रसंगात सापडल्यावर, म्हणजे स्वत: व्यक्ती आहोत हे मनानी पूर्ण पटवून दिल्यावर लढायला सुरूवात करतोयं. जाणीवेचं विचारात रूपांतरण झाल्यावर एक विचार दुसऱ्या विचारालाच जन्म देणार, विचार जाणीवेप्रत कसा येईल? तुमचं स्टेशन सुटलंय, गाडी पुढे गेलीये!

जाणीवेत स्थिर राहण्याचा प्रयत्न भल्या पहाटे, सर्व प्रथम, दिवस सुरू होण्यापूर्वी, प्रसंगानी वेग घेण्यापूर्वी करायला हवा. सराव,  जाणीव म्हणजे तुम्ही शुद्ध स्वरूपात आहात, आनंदात आहात, रिलॅक्स्ड आहात, कुठेही उन्मुख झालेले नाही  तेव्हा  करायला हवा.

काय करतात सर्वजण अशा वेळी? पुढचे प्लॅन! आता काय गेम करूया? आणखी थोडा हात कसा मारायचा? सांपत्तिक स्थिती अजून कशी मजबूत करूया? पैसे शेअर्समध्ये लावू की नवी प्रॉपर्टी घेऊन भाड्यानी देऊया? अमेरिकेला कधी जायचं? अजून युरोप संपूर्ण नाही बघून झाला, जोपर्यंत हातपाय चालू आहेत तोपर्यंत काय करायच ते करून घेऊ! काहीच शक्य नसेल तर करा नामस्मरण, करा काही तरी भवतापातून सुटायचा उपाय!

आणि मजा काय आहे? जोपर्यंत तुम्ही कुठेही उन्मुख नाही तोपर्यंत स्वत:त स्थिर आहात, तुमचं उन्मुख होणं म्हणजेच जाणीवेचं विचारात रूपांतरण होणंय. एकदा तुम्हाला त्या स्थिरत्वाची जाणीव झाली आणि तिथे तुम्ही स्वत:ला पुन्हापुन्हा आणायला लागलात तर मग तुम्हाला प्रसंगात न अडकता प्रसंग हाताळण्याचं कौशल्य येतं!   

>बरं, सतःला सारखं बजावत जावं कि आपण निराकार आहोत, तर आत कुठेतरी खोटं बोलण्याची जाणीव होते. मग अश्या दुभंगलेल्या अअस्थेत राहण्यापेक्षा मी व्यक्तीत्वाचा सीकार करतो आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देतो.

= तुम्हाला जाणीव कशी उन्मुख होते आणि मन आणि जाणीव यातला फरक एकदा कळला की खरं काय आणि खोटं काय याचा उलगडा होईल. मग तुम्हाला मनाचा चकवा समजेल.

मी जेव्हा म्हणतो की आपण निराकार जाणीव आहोत ही खूणगाठ मनाशी बांधा तेव्हा माझं इतकंच म्हणणंय की जाणीवेच्या उन्मुख होण्यापूर्वीच्या स्थितीत वारंवार येण्याचा प्रयत्न करा. ओशो किंवा इतर सिद्ध या प्रयत्नाला वर्तमानात राहा म्हणतात! 

 >हे चक्र कसं भेदायचं काही कळत नाही...

= चक्र भेदायची एकच कला आहे, प्रसंगात सापडण्यापूर्वी जाणीवेत स्थिर राहण्याचा सराव करा. भवसागराची लाट उसळण्यापूर्वी तरंगायला शिका, तुम्ही फुर्सतीचा वेळ माझं लेखन वाचण्यात घालवा, तुम्हाला एकदा स्वत:शी संलग्न राहता यायला लागलं की नुसतं स्वस्मरण पुरेसंय, मग वाचन देखील थांबवा.

संजय