'अलविदा जगजीतसिंग'करिता 'जगजीतसिंगांना निरोप' हा पर्याय किंचित संदिग्ध वाटतो. म्हणजे, प्रथमदर्शनी एखाद्याची समजूत "हा  'जगजीतसिंग के लिए पैग़ाम'करिता पर्यायी मथळा असावा" अशी होण्याची शक्यता दाट वाटते. (माझी झाली!) आणि मग "दिवंगत श्री. जगजीतसिंग यांना कोण्या जकार्ताकराने काय संदेश धाडला असावा बरे" या कुतूहलाने  वाचायला जावे, तर असा कोणताच संदेश / निरोप / विरोप / गेलाबाजार व्यनिसुद्धा औषधालादेखील न सापडल्याने अपेक्षाभंग होतो.

(अवांतर: तशी दुसऱ्यांची पत्रे वाचू नये म्हणतात, पण इथे जर कोणी आपण होऊन आपले निरोप सगळ्यांसमोर मांडून ठेवणार असेल, तर मग काय कोणीही वाचेल! कदाचित म्हणूनच येथे "निरोप" गुलदस्तात ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली असावी काय, अशीही शंका येऊ लागते.)

असो. तर मग याला अधिक अनुरूप पर्याय कोणता योजावा बरे?

'अलविदा'करिता 'रामराम' हा पर्याय उपलब्ध आहे खरा, पण तोही तितकाच संदिग्ध आहे. म्हणजे, कोणापासून विभक्त होताना जसे 'रामराम' म्हणता येते, तसेच कोणी भेटल्यावरसुद्धा 'रामराम' म्हणता येतेच!

मग काय?

'शुभास्ते पंथानः सन्तु जगजीतसिंह'? नको. संस्कृतातील असल्याकारणाने, मराठीतर (मराठी + इतर) भाषेतील पर्याय असूनदेखील चालू शकणारा असला, तरीही शीर्षकाकरिता म्हणून हा पर्याय खूपच लांबलचक आहे. याहून संक्षिप्त पर्याय हवा.

त्यापेक्षा 'जगजीतसिंगांची बोळवण' हा पर्याय उचित ठरावा काय? संक्षिप्तही आहे, शिवाय संदिग्धतेलाही वाव नाही, या दृष्टीने जरूर विचार करण्यायोग्य पर्याय असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)