खाली श्री. महेश यांनी उर्दू शब्दकोशातील अर्थ दिल्यानंतर सर्व पैजा बंद आहेत, आणि तसेही हे मूळ धाग्याच्या विषयाशी पूर्णपणे अवांतर आहे, पण तरीही...
त्या 'मिल गया साहिल मुझे'च्या अगोदरच्या ओळी अशा काहीशा आहेत (चूभूद्याघ्या.):
आप की मंज़िल हूँ मैं, मेरी मंज़िल आप है
क्यूँ मैं तूफाँ से डरूँ, मेरा साहिल आप है
कोई तूफानों से कह दे, मिल गया साहिल मुझे...
आता पहा, 'मेरी मंज़िल आप है'चा सरळसरळ अर्थ यातील 'आप' (म्हणजेच प्रस्तुत गीताचा उत्सवमूर्ती) हा गाणाऱ्या 'मैं'ची (अर्थात प्रस्तुत गीताच्या नायिकेची) 'मंज़िल' आहे, म्हणजेच 'गंतव्यस्थान' आहे, किंवा शुद्ध मराठीत सांगायचे झाले तर 'डेस्टिनेशन' आहे. म्हणजेच अजूनपर्यंत ती तेथे पोहोचलेली नाही, मार्गस्थ आहे. अर्थात पुढील ओळीत ती म्हणते, की 'मेरा साहिल आप हैं' - माझा किनारा (अर्थात, पुन्हा माझे गंतव्यस्थान असलेला किनारा) आपण आहात. ठीक आहे, किनारा ते आहेत, हरकत नाही, पण बये, अजून तू तिथे पोहोचलीयेस कुठे? मग पोहोचण्याच्या आधीपासूनच 'मी वादळाला का घाबरू?', 'अरे, त्या वादळांना कोणीतरी सांगा रे, की मला किनारा सापडलाय, आता मी तुम्हाला घाबरत नाही! ' म्हणून उड्या का मारतीयेस? त्या वादळांच्या झोक्यात भरकटत जाऊन अजूनही तू (किनारा समोर दिसत असूनसुद्धा!) भलत्याच कुठल्यातरी दगडावर आपटून फुटू शकतेस, याचे भान नाहीये का तुला? 'आपली सगळी अंडी उबून फुटल्याखेरीज कोंबड्यांची पिल्ले मोजू नयेत' हे तुझ्या वडीलधाऱ्यांनी तुला कधी शिकवले नाही काय? (पण कदाचित त्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय नसावा - त्यांना दोष नाही देऊ शकत!) की 'हज़रत मुहम्मद पैगंबर (पत्यांशांदे!) जर पर्वतापर्यंत पोहोचले नाहीत, तर पर्वतालाच ह.मु. पैं.पर्यंत (पत्यांशांदे!) तंगडतोड करत यावे लागेल' या न्यायाने, तू जर तुझ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली नाहीस, तर तुझा किनारा तुझ्यापर्यंत पोहत येईल, या गर्भित गैरसमजुतीखाली तू वावरत आहेस? ('Laboring under the misconception' अशा अर्थी.)
'साहिल'चा अर्थ 'किनारा' असा घेतल्यास असे अनेक प्रश्न निर्माण होतात. उलट, 'साहिल'चा अर्थ 'नावाडी' असा घेतल्यास असे प्रश्न पडत नाहीत, उलट चुटकीसरशी उत्तरे सापडतात. (उत्तरे तद्दन चुकीची निघतात, हा भाग अलाहिदा! )
बरे, गीतकारास 'साहिल'चा नेमका अर्थ ठाऊक नसून त्याने उर्दू शब्दकोश पाहवयाचा कंटाळा केला नि आठवला तो शब्द अंदाजपंचे ठोकून दिला अशी अटकळ बांधावी म्हटले, तर तीही शक्यता कमी वाटते. (प्रस्तुत गीताचे गीतकार श्री. राजा मेहदी अली खाँ हे असून, त्यांच्या मातुःश्री या उर्दूतील अग्रगण्य कवयित्री असल्याचा निर्वाळा दुसऱ्यातिसऱ्या कोणी नव्हे, तर डॉ. अल्लामा मुहम्मद इक़्बाल यांनी दिला होता, असे विकीपीडियावरून समजते. म्हणजे खाँसाहेबांचे उर्दू अगदीच कच्चे नसावे. कारण त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या मातुःश्रींच्या देखरेखीखाली झाले होते, असेही विकीपीडियावरील दुवा सांगतो. म्हणजे, चिरंजीव अगदीच ढ असले, तर गोष्ट निराळी; अन्यथा, मातुःश्रींनी त्यांना किमानपक्षी एवढे तरी शिकवणे अपेक्षित असावे, नाही काय?)
एकंदरीत, ही भानगड काय आहे ते कळत नाही, हेच खरे!