हिंदी-उर्दूत झबल्यातला झ नाही, त्यामुळे तो उच्चार संभवत नाही.
अगदी! किंबहुना, 'चवळी'तल्या 'च'च्या वर्गातील कोणतेच व्यंजन* हिंदी-उर्दूत नाही असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
किंबहुना, (मराठी उच्चारांप्रमाणे) 'चवळी'तल्या 'च'च्या वर्गातील कोणत्याही व्यंजनाच्या जवळपाससुद्धा जाणारे (नुक्तावाला) 'ज़' हे बहुधा एकमेव अपवादात्मक व्यंजन हिंदी-उर्दूत असावे. (नक्की खात्री नाही, पण हिंदीलासुद्धा 'ज़' हे व्यंजन ही बहुधा उर्दूची देणगी असावी. म्हणजे, हिंदी-उर्दू कक्षेतील - spectrum अशा अर्थी - बोलींपैकी, कक्षेच्या फारसी-अरबींचा किमान प्रभाव आणि संस्कृतचा कमाल प्रभाव असणाऱ्या टोकाकडील बोलींमध्ये हे व्यंजन बहुधा अत्यंत कमी प्रमाणात - कदाचित अभावाने किंवा अपवादात्मक परिस्थितीतच - सापडावे, आणि जेथे सापडावे तेथे त्याच्या उगमाचा मागोवा बहुधा फारसी-अरबी संस्कारांपर्यंत घेता यावा, अशी एक प्राथमिक निरीक्षणजन्य अटकळ आहे. याची अर्थातच अधिक कसून पडताळणी करावी लागेल.)
यात विशेष करून लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, की या 'ज़'चा उच्चार मराठीतील 'चवळी'ल्या 'च'च्या वर्गातील कोणत्याही व्यंजनासारखा नाही. 'जगण्या'तल्या 'ज'सारखा नाही, आणि 'झबल्या'तल्या 'झ'सारखा तर नाहीच नाही. त्यातल्या त्यात 'जगण्या'तल्या 'ज'च्या जवळ आहे, पण नेमका 'जगण्या'तला 'ज' नव्हे. किंचित buzzing (मराठी?) आहे. (म्हणजे, विजेची करवत लाकडावरून फिरताना किंवा एखादी माशी सतत घोंगावताना जसा आवाज येतो, साधारणतः तशा प्रकारचा आवाज.**) असा ध्वनी मराठीत - किमानपक्षी प्रमाण मराठीत - नसावा.
इंग्रजीत तो उच्चार लिहून दाखवण्यासाठी z हे अक्षर वापरतात.
किंचित सुधारणा. मराठीतील 'झबल्या'तल्या 'झ'चा उच्चार (रोमन लिपीतून) इंग्रजीत लिहिताना 'z' हे अक्षर वापरतात. त्याचप्रमाणे, हिंदी-उर्दूतील ('ज़नाना'तल्या) 'ज़'चा उच्चार (रोमन लिपीतून) इंग्रजीत लिहिताना 'z' हेच अक्षर वापरतात. मात्र, या दोन ध्वनींत साधर्म्य नसून ते दोन पूर्णपणे वेगवेगळे ध्वनी आहेत. मराठीतून इंग्रजीत लिप्यंतराचे आणि हिंदी-उर्दूतून इंग्रजीत लिप्यंतराचे संकेत भिन्न आहेत, एवढेच काय ते यामागील तात्पर्य आहे.
तळटीपा:
* कदाचित तेवढे अनुनासिक वगळल्यास. कारण 'ञ' हे 'चपले'तल्या 'च'च्या वर्गातील अनुनासिक असावे; ते 'चवळी'तल्या 'च'च्यासुद्धा वर्गातील अनुनासिक आहे किंवा नाही याबद्दल साशंक आहे.
** अवांतर: येथे 'buzzing' करिता 'घोंगावणारा' हा पर्याय कितपत उचित ठरावा?