लेखनाचा बाज तटस्थ वृत्तांकनाचा राखलाय म्हणजे त्यात शेरेबाजी अभिप्रेत नाही हे उघड आहे. नोंदी कितपत गंभीर वगैरे आहेत किंवा नाहीत ते हवं तर वाचकाने ठरवावं.किंबहुना त्यांचं गांभीर्य वाचकाच्या मनावर ठसू नये असाच छुपा प्रयत्न जाणवतो. म्हणजे असं की 'पहा बुवा. मी काहीच म्हणत नाहीय. तुमचं तुम्ही काय ते ठरवा' असा आव (किंवा आविर्भाव).
हे शैलीबाबत झालं तरी अंतःप्रवाह गंभीर आहे. विस्थापनाची (पुनर्वसनाची) समस्या आज इतकी वर्षं लोंबकळत पडलीय हे वास्तव कठोर पणे समोर येतंच. पण व्यक्तिशः मला विषण्णता आली ती ह्या उघड्या वास्तवामुळे नाही तर आजच्या सामाजिक आणि राजकीय चौकटीत त्यावर त्वरित उपाय , जवळचा रस्ता, सापडण्याजोगा नाही या अधिक भीषण वास्तवामुळे. मेंढरांच्या कळपातून शहाणे नेते, प्रशासक नजीकच्या काळात निर्माण होतील अशी आशा दिसत नाही. अडाणी (अज्ञानी) लोकांमध्ये/कडून लोकशाही  (यात प्रशासकीय यंत्रणाही आलीच.) राबवताना असं घडणं  अपरिहार्य असावं काय? 
मतदारांना सुजाण करणं हे हर्क्यूलियन टास्क(मराठीत डोंगराएव्हढं काम?) आहेच पण अशा सुजाण झालेल्या मतदारांना नेतानिवडीसाठी सुयोग्य पर्याय मिळणं हेही  तितकंच कठिण दिसतंय. कारण लोकांना खुश राखणं हे अधिक महत्त्वाचं ठरतंय त्यामुळे उत्तम लोकसंग्रह असणारा बाजी मारून जातोय.
तरीही, नजीकच्या भविष्यकाळाविषयी नसला तरी सुदूर भविष्याविषयी आशावाद बाळगण्याजोगा आहे असं वाटतं.