पौगंडावस्थेतील मुलांचे लक्ष विचलित होणे समजू शकते. पण शिक्षकांचेही?  म्हणजे विकृती हीच संस्कृती झाली म्हणायची. अशा सार्वत्रिक विकृतीपासून कुठवर स्वसंरक्षण करीत राहाणार? येथे स्वतःच्या पायाला धूळ लागते म्हणून सर्व जमीन चामड्याने मढवून काढण्याचा आदेश देणाऱ्या राजाच्या गोष्टीची आठवण होते. त्या गोष्टीत शेवटी त्याच्या चतुर प्रधानाने त्याला समजावले की हे काम अशक्यप्राय आहे. त्या ऐवजी स्वतःचेच पाय चामड्याने झाकले तर तोच परिणाम चुटकीसरसा साधता येईल.(तात्पर्य :ज्याचे त्याने ज्याला त्याला हवे तसे शोधावे.)
उलटपक्षी, आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आविष्कारासाठी हाच एकमेव पर्याय स्त्रियांना उपलब्ध आहे का या प्रश्नावर ' एकमेव नसला तरी अनेकांपैकी तो एक आहे' असे उत्तर देता येईल.
समाजामध्ये स्त्रियांच्या पेहरावाविषयी वाजवीपेक्षा जास्त सजगता असते आणि चर्चाही वाजवीपेक्षा जास्तच होते असे दिसते.आणि ही गोष्ट आजची नाही. खुद्द आपल्या महाराष्ट्रात 'स्त्रियांनी सकच्छ नेसावे की विकच्छ' यावर जंगी वाद ७०-८० वर्षांपूर्वी त्या काळच्या माध्यमांतून, विषेषतः 'स्त्री' मासिकातून झडलेले आहेत. फरक इतकाच की त्या काळी विकच्छ सहावारी हा सकच्छ नऊवारीचा  मिनिअवतार समजला जायचा.
म्हणजे मिनि-म्याक्सी चा झगडा तेव्हापासूनचाच आहे!
पुरुषांच्या शर्ट-प्यांट, पंचा-धोतर-टोपी, सदरा-कमीज-लेहेंगा-शेरवानी, लुंगी-मुंडू-वेष्टी यांची लांबीरुंदी  किती असावी यावरही लवकरच वाद झडोत ही शुभेच्छा.