आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार करण्यासाठी आखूड कपडे किंवा स्लटसारखे कपडे घालणे हा एकमेव पर्याय स्त्रियांना उपलब्ध आहे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर अर्थात नाही असेच आहे, पण असा प्रश्न पडावा अशी वेषभूषा करणाऱ्या स्त्रिया आहेत ही वस्तुस्थीती आहे आणि ती तशी असावी ह्याचे वाईटही वाटते. स्त्री ही आधी माणूस आहे, मग स्त्री. तिला उपभोग्य वस्तू समजू नये हे समाजाला पटविण्यासाठी ज्या अनेकींनी लढे दिले त्या सर्वांवर अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया पाणी फिरवतात असे मला वाटते. अंगप्रदर्शन करण्यामागे आधी माझ्या शरीराकडे पाहा वा माझ्याकडे शरीराकडेच तेवढे पाहा, असे सांगण्याची वृत्ती असते, असे मला वाटते आणि त्याचा निषेधही करावासा वाटतो. इतरांनी आपापल्या मनांना विचलित होऊ देऊ नये असे म्हणणे सोपे असले तरी इतरांचे मन विचलित होत असते ही वस्तुस्थिती आहे. त्या विचलित मनःस्थितीचे वाईट परिणाम अंगप्रदर्शन करणाऱ्या बाईवर झाले नाहीत तरी ते इतर एखाद्या बाईवर होऊ शकतात. त्यामुळे आखुड कपडे घालण्याला आणि त्यामागच्या मानसिकतेला माझा विरोधच असेल.