प्रथम स्पष्ट करतो की मला तुमच्या ज्ञानाबद्दल खूप आदर आहे. मी पुढे जे म्हणेन ते फक्त भाषेतील शब्दांच्या वापरावर आहे. वैयक्तिक टीका किंवा तुमच्या ज्ञानाबद्दल संशय घेण्याचा मुळीच हेतू नाही. प्रोटॉन = धनक तर पॉझिट्रॉन = ? आणि इलेक्ट्रॉन = वीजक तर ऋणक का नाही? खरे तर वीजक हा शब्द मला प्रथमदर्शनी आवडला होता. न्यूट्रॉनला वापरलेला विरक्त हा शब्द तर मुळीच आवडला नाही. लाल रंगाचा अभाव असणारा वगैरे असा विचित्र अर्थ प्रथमदर्शनी मनात प्रक्षेपित झाला. एका लेखकाने धनकण, ऋणकण आणि तटस्थ कण असे शब्द योजले होते. अर्थ न देताही त्यांचा अर्थ कळतो. तरीही पॉझिट्रॉनला त्याने काय म्हटले असते सांगता येत नाही. प्रचलित शब्द अस्तित्वात असतांना नवे शब्द शोधण्याचा खटाटोप कशासाठी? प्रत्येक लेखकाने वेगळे शब्द वापरले तर वाचकांनी काय करावे?

शालेय पाठ्यपुस्तकातील शब्द आपण न वापरण्याचे कारण काय असू शकेल याचा मी विचार करीत आहे. आपण बरीच पुस्तके संदर्भासाठी वापरली असतील. मग आणखी एक वापरायला काय हरकत होती? अर्थात हे माझे वैयक्तिक मत. न पटल्यास सोडून द्यावे. आपले मत वेगळे असू शकते. 'आण्विक वस्तुमान' आणि 'आण्विक वस्तुमान एकक' या दोन्हीसाठी आमच्या काळी अणुभार असा एकच शब्द वापरला होता. सध्या काय शब्द प्रचलित आहेत ठाऊक नाही.