मराठीत "इलेक्ट्रॉनिक्स"ला "इलेक्ट्रॉनिक्स" आणि "आयनायझेशन"ला "आयनीभवन" म्हणत राहणे
मलाही अजिबात आवडलेले नाही. कविवर्य सुधीर भट म्हणतात त्यानुसार,
"ही  न मंजूर वाटचाल मला, दे भविष्या तुझी मशाल मला"

शालेय अभ्यासक्रमामध्ये जे शब्द अंतर्भूत आहेत ते पारिभाषिक शब्द वापरावेत.
शालेय अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध नसलेल्या शब्दांसाठीच नवे शब्द घडवावे ह्या मताची मी आहे. 
>>> हे मलाही पटतेच आहे.

अन्यथा एक असताना दुसरा शब्द घडवण्यामध्ये परिभाषा असण्यामागचा उद्देशच नष्ट होतो. >>>
मात्र दुसर्‍या भाषेतील शब्द कायमच आयात करत राहण्याने भाषेचा विकास होत नाही. खुंटतो. जसा आज खुंटला आहे.
जपान, चीन व अनेक युरोपिअन देशांत आज "विद्या-वाचस्पती (मास्टर)", "पंडित (डॉक्टर)" सर्वोच्च पदव्या त्या त्या देशाच्या भाषेतून प्राप्त करता येतात. त्याकरता संपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञानाची परिभाषा बदलत्या जगासोबत तेथे निरंतर घडत राहिली हे आहे. मराठी भाषेत आज सर्वोच्च पदव्या मराठीत उपलब्ध नाहीत. कारण मराठी भाषेने, बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञान संदर्भांत विचारमंथन करून निरंतर नवी परिभाषा निर्माण करण्याचे बंद केले. सुरूवातीस इंग्रजांनी ही प्रक्रिया हेतुतः खुंटवली, आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६४ वर्षे उलटूनही पारतंत्र्याच्या जोखडातून आपली मने मुक्त झालेली नाहीत.

मराठीत उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे. शालेय जीवनातील इंग्रजीची सक्ती पूर्णतः हटवली जावी. शालेय जीवनात इंग्रजीला शेकडो सशक्त पर्याय उपलब्ध व्हावेत. मराठी माध्यमाच्या गणित विषयातून इंग्रजीत आकडे लिहिण्याची उफराटी सक्ती हटवली जावी. एवढे नवीन विषय मराठीतून पहिल्यांदाच चर्चिले जावेत, की मग इतर भाषा मराठीतून शब्द घेतील, अशी अवस्था निर्माण व्हावी. अशी माझी इच्छा आहे. याकरता मी कटिबद्ध आहे.

जगातील संपूर्ण विज्ञान, तंत्रज्ञान यांसहित सर्व आघाडीच्या विषयांचे मंथन मराठीत करून, निरंतर नव्या परिभाषांना घडवत राहण्याच्या प्रक्रियेस सशक्त चालना देण्याचा माझा विचार आहे. याकरता मी कटिबद्ध आहे.

ही विज्ञानमाला याचाच एक भाग आहे. इथे संपूर्ण परिभाषा संचाचाच पुनर्विचार होणार आहे. अनेक विषय पहिल्यांदाच मराठीत लिहिले जाणार आहेत. नवे शब्द सातत्याने घडले जाणार आहेत.

"एखादा शब्द मला अजिबात आवडलेला नाही" हा निकष, परिभाषेच्या उन्नयनाकरता प्रस्तावित नव्या शब्दांना नाकारण्यास पुरेसा ठरू नये. त्यावर साधक-बाधक चर्चा व्हावी भाषेच्या विकासाबाबत केवळ तज्ञांनीच नव्हे तर सामान्यांनीही स्वीकृती-अस्वीकृतीची मोहोर उठवावी. मात्र होता होईल तोवर सर्व पर्यायी शब्द प्रचलित राखावेत असे मला वाटते.

मूलकीकरण हा शब्द मला कुठेही गवसलेला नाही. तो मीच घडवला आहे. त्याच्या योग्यायोग्यतीची चर्चा अवश्य व्हावी.

मी तुम्हाला अशी चर्चा करण्यास अतिशय पात्र व्यक्ती मानतो आहे. आपल्या पूर्ण क्षमतांच्या साहाय्याने मराठी  भाषेस समृद्ध करा!