शालेय पाठ्यपुस्तके म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नसली तरी किमान विज्ञान आणि गणित विषयांसाठी पाठ्यपुस्तकातील शब्द आधी वापरावेत आणि गरज पडल्यास नवे शब्द घडवावेत असे माझे मत आहे. गणित व विज्ञान हे जागतिक विषय आहेत. चीन, जपान आणि युरोपीय देशांतील लोक त्यांच्या भाषेत उच्चशिक्षण घेत असतीलही. मात्र, जेव्हा शोधनिबंध लिहिण्याची वेळ येते तेव्हा त्यांना तो इंग्रजीतच लिहावा लागतो. तेव्हा इलेक्ट्रॉन, प्रॉटॉन, न्युट्रॉन, आयन यांसारखे शब्द मराठी वाक्यांमधून तसेच वापरावेत असे माझे मत आहे.
शालेय पाठ्यपुस्तकांतून विज्ञान शिकणाऱ्या आणि इतर लेख/पुस्तकांतून मराठीतून विज्ञानविषयक ज्ञान मिळवणाऱ्यांच्या संख्येची तुलना करता ती पहिल्या प्रकारात जास्त आहे. तेव्हा जे शब्द शालेय पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांना ओळखीचे झाले आहेत ते शब्द हे विद्यार्थी मोठे झाल्यावरही वापरण्याची शक्यता अधिक आहे. किमान त्यांनी स्वतःहून ते वापरले नाहीत तरी कुठे वाचनात आल्यास त्यांना तो शब्द ओळखीचा वाटून अर्थबोध लवकर होण्याची शक्यताही वाढते. मात्र पर्यायी शब्दांनी हे साध्य होईलच असे नाही. परिभाषा ही काटेकोर असायला हवी आणि म्हणूनच त्यात समानार्थी पर्यायी शब्दांची जंत्री नको असे माझे मत आहे. त्यामुळे तुमचे "मात्र होता होईल तोवर सर्व पर्यायी शब्द प्रचलित राखावेत असे मला वाटते" हे मत मला मान्य नाही.
इलेक्ट्रॉनसाठीचा वीजक शब्द वीज करणारा ह्याअर्थी मला आवडला. मात्र धनक, ऋणक, विरक्तक हे शब्द योग्य अर्थ व्यक्त करत नाहीत आणि त्यामुळे मला आवडले नाहीत. क हा करणारा ह्या अर्थी वापरला जातो. इथे करणारा नव्हे तर असणारा हा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही अट्टाहासाने हे शब्द वापरलेत तरी किमान मी हे शब्द माझ्या लेखनात वापरणार नाही.
बाकी तुम्ही नेटाने मराठीतून विज्ञानविषयक लेखन करत आहात ही आनंदाचीच गोष्ट आहे. मात्र, हे करताना प्रचलित शब्दांचा अधिकाधिक वापर तुम्ही करावा आणि पुढील भाग लिहिण्यापूर्वी शालेय पाठ्यपुस्तके पाहावीत असे सुचवावासे वाटते.