कदाचित आज-काल जोम धरू बघणारी वृत्ती ' आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही' ही या मागे असेल. कारण पुरुष जर उघडा फिरू शकतो तर आम्हीच का नाही असा विचार करणारे हे विसरतात की शेवटी निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यांच्या देह रचनेत फरक केला आहे. कोणत्याही जातीत (पशू पक्षी या अर्थी) मादी हीच नराला आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असते. पण मानवी समाजात मात्र साधारणपणे पुरुष पुढाकार घेत असतो. त्यातही जर वयात येणारी मुले असतील तर निसर्गतःच शारिरीक आकर्षण असते. ते मुलींच्या अशा वेषभुषेने विचलित नाही झाले तरच नवल. मग काही अविचार घडला तर मुलाला दोष दिला जातो. त्यामुळे मुलींनी फॅशन करतानाही काही पथ्ये पाळली तर बरेच प्रश्न सोपे बनतील. एक आठवण सांगाविशी वाटते. माझ्या एका दिरासाठी मुली बघत असताना त्याची एक अट होती की पुरुषी कपडे ( जीन्स-टॉप, शर्ट वगैरे) घालणारी मुलगी नको. आम्ही त्याला म्हणत होतो की एकतर अशी मुलगी आजकाल मिळणे कठीण आणि आधी ती काही घालत असो लग्नानंतर तिला नको घालू देऊस. पण तो आपल्या मतावर ठाम होता. शेवटी मी त्याला विचारले की तिने जीन्स नंतर घालण्याला तुझा विरोध मी समजू शकते पण आधी का नको? तर त्याने उत्तर दिले की तुम्ही मुलगा बघताना कायम साडी किंवा स्त्रीवेष घालणारा मुलगा पसंत केला असता का? भले लग्नानंतर मग तो शर्ट पँट घालायला सुरुवात करेल. तसेच आहे स्त्रियांनी भलत्याच बाबतीत पुरुषांची बरोबरी करू नये असे मला वाटते.